यवतमाळ : आज सकाळपासून उमरखेड मतदारसंघात समाजमाध्यमावर वंचित बहुजन आघाडीचे उमदेवार तातेराव हणवते यांनी १०० रूपयांच्या प्रतिज्ञापत्रावर लिहून दिलेले कथित पाठींब्याचे पत्र व्हायरल झाले. या पत्रात ‘महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी, समजाहिताकरीता व जातीवादी शक्तीला हद्दपार करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार साहेबराव कांबळे यांना जाहीर पाठींबा,’ देत असल्याचे लिहिलेले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या नावाने जाहीर झालेल्या या पत्राने पक्षात एकच खळबळ उडाली. मात्र वंचितचे महासचिव डी.के. दामोधर यांनी वंचितचे उमेदवार तातेराव हणवते यांनी  काँग्रेसला पाठींबा दिल्याचा दावा फेटाळला आहे. हे प्रतिज्ञापत्र खरं आहे की खोटं याची शहानिशा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. वंचितच्या कार्यकर्त्यांसह मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी विरोधकांनी हा प्रकार केला असावा. वंचितच्या उमेदवाराने किंवा वंचित बहुजन आघाडी पक्षाचा काँग्रेसला पाठींबा देण्याचा प्रश्नच नसल्याचे दामोधर यांनी सांगितले.

दरम्यान वंचितचे उमेदवार तातेराव हणवते यांनी समाजमाध्यमावर एक व्हिडीओ प्रसारित करून विरोधकांनी खोटी पोस्ट व्हायरल केल्याचा दावा केला आहे. आपण वंचितचे अधिकृत उमेदवार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विरोधकांना आपला प्रचार पाहून धडकी भरल्याने त्यांनी जाणीवपूर्वक अशा पोस्ट प्रसारित केल्याचे हणवते यांनी म्हटले आहे.

हेही वाचा >>> अनिल देशमुखांचा सहानुभूतीसाठी स्टंट; चित्रा वाघ म्‍हणतात, ‘पुराव्‍यानिशी पर्दाफाश करू…’

मतदारांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. या व्हिडीओत वंचितचे उमेदवार हणवते यांनी कुठेही आपण काँग्रेसला पाठींबा दिला नाही, असे स्पष्ट केलेले नाही. केवळ विरोधकांनी खोटी पोस्ट व्हायरल केली असा उल्लेख केला असल्याने त्यांच्या हेतूबद्दल मतदारसंघात चर्चा होत आहे. उमेदवार हणवते हे दोन दिवसांपासून मतदारसंघात ‘नॉट रिचेबल’ असल्याने विविध चर्चा आहे.

हेही वाचा >>> ‘हिंदी चिनी भाई-भाई’च्या धर्तीवर ‘हलबा- मुस्लिम भाई-भाई’चे नारे, मध्य नागपुरात…

वंचितचे महासचिव दामोधर यांना उमेदवार कुठे आहे, असे विचारले असता, आम्ही आत्ताच त्यांच्याशी फोनवर बोललो. त्यांनी पाठींब्याची पोस्ट खोटी असल्याचा व्हिडीओ पाठवला, असे सांगितले. उमरखेड हा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असल्याने येथे वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या विचारधारेचा प्रभाव आहे. वंचितच्या मत विभाजनाचा फायदा भाजपला होत आला असून काँग्रेसचे नुकसान झाल्याचे राजकीय जाणकार सांगतात. त्यामुळे हा प्रकार घडल्याची चर्चा आहे.

उमरखेड विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत अखेरच्या दिवशी बहुजन वंचित आघाडीच्या उमदेवाराने काँग्रेसच्या उमेदवारास पाठींबा दिल्याची अफवा पसरली. त्यामुळे वंचितच्या मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या प्रकाराने उमरखेडच्या निवडणुकीत ‘ट्विस्ट’ निर्माण झाले आहे.

बंडखोर उमेदवाराकडून पाठींबा व पाच लाखांची मदत

शिवसेना (ठाकरे गट)चे बंडखोर उमदेवार मोहन मोरे यांनीही कॉंग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे यांना पाठींबा जाहीर केला आहे. मोरे यांच्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीची अडचण झाली होती. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समज दिल्यानंतर मोरे यांनी कांबळे यांना पाठींबा दिल्याची चर्चा आहे. मोहन मोरे यांनी उमरखेडमध्ये पत्रकार परिषद घेवून साहेबराव कांबळे यांना प्रचाराकरीता पाच लाख रूपयांचा मदतनिधी देत असल्याची घोषणा करत पाठींबा जाहीर केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Umarkhed assembly constituency vba candidate affidavit mention support congress viral on social media maharashtra assembly election 2024 nrp 78 zws