यवतमाळ : जिल्ह्यातील उमरखेड बसस्थानकावर स्वारगेट अत्याचार प्रकरणाची पुनरावृत्ती घडली. फरक एवढाच की, येथे एका बस चालकाने अल्पवयीन मुलीस फूस लावत नागपूर येथे नेवून अत्याचार केला. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.या बस चालकाने अल्पवयीन मुलीला एसटी बसने उमरखेड येथून नांदेड व तेथून नागपूर येथे नेले. त्यानंतर नागपूर येथील खोलीवर त्या अल्पवयीन मुलीवर जबरीने अत्याचार केला. ही घटना सोमवारी उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी नराधम बस चालकास जेरबंद केले आहे.

संदीप विठ्ठलराव कदम (४०), रा.महात्मा फुले वार्ड, उमरखेड असे आरोपीचे नाव आहे. २२ मार्च रोजी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास अल्पवयीन मुलगी बसस्टँड उमरखेड येथे उभी होती. यावेळी बस चालक आरोपी संदीप कदम हा अल्पवयीन मुलीजवळ आला. त्याने तिला कुठे जात आहे, आदी जुजबी चौकशी केली. त्यानंतर तिला विश्वासात घेऊन सोबत नांदेड येथे घेऊन गेला. आरोपीची ड्युटी नांदेड ते नागपूर बसवर असल्याने तो अल्पवयीन मुलीला नांदेडहून नागपूर येथे सोबत घेऊन आला. रविवारी २३ मार्चच्या पहाटे ५ वाजताच्या सुमारास ते नागपूर बस्थानक येथे पोहचले. त्यानंतर आरोपी अल्पवयीन मुलीस आपल्या खोलीवर घेऊन गेला. रुमवर इतर कोणीही नसल्याने त्याने जबरदस्तीने अल्पवयीन मुलीशी शरीर संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर आरोपी हा अल्पवयीन मुलीला सोलापूर बसने सोलापूरकडे घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी पथक तयार करून त्याच्या मागावर ठेवले.

आरोपी उमरखेड बस स्थानक येथे येताच त्यास तातडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलीच्या जबानी तक्रारीवरून उमरखेड पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे नोंद केले.ही कारवाई यवतमाळ पोलीस अधिक्षक कुमार चिंता , अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी बी. जे. हर्षवर्धन, पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे, सारीका राऊत आदींनी केली. गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बी.जे. हर्षवर्धन हे करीत आहे.
स्वारगेट घटनेनंतर राज्यातील सर्व बसस्थानकावरील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याची घोषणा सरकारने केली होती. प्रत्यक्षात राज्यातील बसस्थानके अल्पवयीन मुली, महिला यांच्यासाठी अद्यापही असुरक्षित असल्याचे या घटनेवरून पुन्हा स्पष्ट झाले.