वर्धा : आभाळ हेच छत आणि जमिनीवरच झोप अशी दैना वाट्यास आलेल्या चिमुकल्यांना वेचून त्यांचा सांभाळ करणाऱ्या उमेद संकल्प या प्रकल्पाची महती ऐकून युवा नेते आमदार रोहित पवार यांची पावले स्वतःहून तिथे वळली. ते संकल्प यात्रेवर आले आहेत.
वर्धेलगत रोठा या गावी मंगेशी मून हे अभिनव असा उपक्रम राबवितात. त्यास भेट देण्याचे पवार यांनी आधीच ठरविले होते. इथे पोहोचताच त्यांनी मून यांना भेट देण्यास येत असल्याचे कळविले. पोहोचताच त्यांनी मुलांशी हितगुज सुरू केले. अभ्यास व अन्य बाबत माहिती घेतली. तसेच कोणतेही अनुदान मिळत नसूनही हे कार्य हिमतीवर चालवीत असल्याबद्दल मून यांची प्रशंसा केली.
हेही वाचा – टोलमुळे शासनाला महसुलाची ‘समृद्धी’! महामार्गावर ४२२ कोटी ९ लाख रुपये वसूल
हेही वाचा – अमरावती : कारचा पाठलाग; युवतीवर गोळीबार करून हल्लेखोर पसार
मुलांना फिरण्याची उपजतच आवड असते हे हेरून त्यांनी सर्व मुलांना बारामती येथे घेवून येण्याचे मून यांना सांगितले. खर्चाची काळजी नको, असे सांगतानाच त्यांच्या सचिवास नोंद करण्याची सूचना केली. हे ऐकून मुलांनी रोहीतदादा, रोहितदादा करीत गलका केला. पुढे या मुलांचा उच्च शिक्षणाचा भार उचलण्याची हमी घेतली. मून म्हणाल्या की पवार यांची भेट आम्हास खूप आनंद देणारी ठरली आहे.