नागपूर : उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यात ३१ डिसेंबरला पर्यटक वाहनांनी वाघीण आणि तिच्या बछड्यांचा दोन्ही बाजूने मार्ग रोखल्याची घटना उघडकीस आली होती. पर्यटनाच्या नावावर अशाप्रकारच्या घटना वारंवार होत असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याप्रकरणाची गंभीर दखल घेतली. उच्च न्यायालयाने याबाबत सोमवारी स्वत:हून जनहित याचिका दाखल करण्याचे आदेश देत राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांना दोन दिवसात जबाब नोंदविण्याचे आदेश दिले.
वाघांना पर्यटकांनी घेरले
३१ डिसेंबरला ‘एफ २’ वाघीण आणि तिच्या पाच बछड्यांना पर्यटकांच्या वाहनांनी बराच वेळ घेरले होते. या वाघिणीची व तिच्या बछड्यांची वाट रोखून धरली होती. उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील कुही वनक्षेत्रातील गोठणगाव सफारी मार्गावर ही घटना घडली. याबाबत वृत्तपत्रांनी प्रकाशित केलेल्या बातम्यांच्या आधारावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी स्वत:हून जनहित याचिका दाखल करून घेण्याचे आदेश दिले. यासह न्यायालयाने राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक यांना बुधवारपर्यंत याबाबत भूमिका स्पष्ट करण्यासाठी सांगितले आहे. प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी जबाब नोंदविल्यावर बुधवारी याप्रकरणी न्यायालयात सुनावणी होणार आहे. मागील काही महिन्यापासून व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यात वाघांचा रस्ता अडविल्याचे प्रकरण वारंवार बघायला मिळत आहे. वन पर्यटनाबाबत स्पष्ट नियमावली असताना देखील जिप्सी चालक आणि मार्गदर्शक नियमांचे सर्रास उल्लंघन करत आहे. व्याघ्र पर्यटनाचे वाढलेल्या आकर्षणामुळे पर्यटकांकडूनही नियमांची पायामल्ली होती. या सर्व पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने याप्रकरणाची दखल घेण्याचा निर्णय घेतला. येत्या बुधवारी न्यायालयाकडून याबाबत न्यायालयीन मित्राची नियुक्ती केली जाईल आणि पुढील सुनावणी होईल.
नियमांचे सर्रास उल्लंघन
अभयारण्यात एफ-२ वाघीण आणि तिच्या पाच बछड्यांचा रस्ता अडवणाऱ्या चार पर्यटक वाहनचालक आणि मार्गदर्शकांच्या निलंबन कालावधीत वाढ करण्यात आली आहे. तर दंडाच्या रकमेत देखील वाढ करण्यात आली आहे. यात सहभागी असणाऱ्यांवर प्राथमिक गुन्हा नोंदवण्याचा आदेश देण्यात आला आहे. चारही पर्यटक वाहनचालक आणि मार्गदर्शकांचे निलंबन आता सात दिवसांवरून तीन महिन्यांसाठी करण्यात आले आहे. पर्यटक वाहनांना २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर पर्यटक मार्गदर्शकांना एक हजार रुपयाचा दंड ठोठावण्यात आला आहे. या घटनेत सहभागी असणाऱ्या पर्यटकांविरुद्ध प्राथमिक गुन्हा नोंद करण्याचा आदेश देण्यात आले आहे.