नागपूर : भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती आघाडीच्या १९ ते २० जानेवारीदरम्यान  डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह परिसरात होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उपस्थित राहण्याबाबत अनिश्चितता आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने कस्तुरचंद पार्कवर जाहीर सभा होणार असून त्याला केंद्रीय मंत्र्यासह विविध राज्यातील मंत्री उपस्थित राहणार आहेत, असे  भाजपचे शहर अध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी सांगितले.

अधिवेशनाचे उद्घाटन १९ जानेवारीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार असून समारोपाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील. अनु.जाती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार विनोद सोनकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमाला सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत, भूपेंद्र यादव यांच्यासह अनु. जातीतील विविध केंद्रीय व विविध राज्यातील मंत्री उपस्थित राहणार आहेत. २० तारखेला दुपारी २ वाजता अधिवेशनाचा समारोप झाल्यानंतर दुपारी ३ वाजता कस्तुरचंद पार्कवर जाहीर सभा होईल. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे  यांच्यासह विविध राज्यातील मंत्री उपस्थित राहणार आहेत. सर्व प्रतिनिधींची व्यवस्था शासकीय विश्रामगृहासह आमदार निवास आणि शहरातील विविध हॉटेल्समध्ये करण्यात आल्याचे कोहळे यांनी सांगितले.

Story img Loader