बुलढाणा : संग्रामपूर तालुकाच नव्हे तर जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे गाव म्हणजे पातुर्डा. संग्रामपूर तालुक्यातील सर्वात मोठ्या पातुर्डा ग्रामपंचायतच्या निवडणुकीत यंदा काका-पुतण्यात गावाचा कारभारी होण्यासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत पुतण्याने बाजी मारली.
पुतण्या सरपंच झाला खरा पण बहुमत मात्र काकांच्या बाजूने असल्याचे मजेदार चित्र आहे. आता या अडचणींवर पुतण्या कशी मात करून गावाचा विकास करतो की काकासाहेब त्याच्या मनसुब्यात बहुमताची अडचण उभी करतो याकडे गावकऱ्यांसह तालुक्याचे लक्ष लागले आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत कधीकधी रक्ताचे नाते गौण ठरतात अन् राजकीय नाती भारी ठरतात. याचे उदाहरण पातुर्डा गावात यंदाच्या सरपंचाच्या चुरशीच्या लढतीत पहावयास मिळाले.
भाजपकडून समाधान गंगतिरे तर काँग्रेस (महाआघाडी) कडून रणजित रामदास गंगतिरे हे मैदानात उतरले. काका पुतण्याची ही लढत आणखी रोमांचक बनवण्यासाठी एक माजी सैनिकही रिंगणात उतरले. मात्र, अंतिम लढत ‘घरातच’ झाली. यात रणजित हे विजयी ठरून त्यांनी ६७९ मतांनी काकांना पराभूत केले.
हेही वाचा: ..तर मुख्यमंत्र्यांकडून अनेक चुकीचे निर्णय घेतले जातील; जितेंद्र आव्हाड यांची टीका
मात्र, काकांच्या गटाने १७ पैकी १३ जागा जिंकून बहुमत मिळवले. भाजप (१० जागा) वंचित आघाडी (३) युतीने बहुमत मिळवले. पुतण्याच्या बाजूचे अर्थात माजी जिप उपाध्यक्ष राजू भोंगळ गटाचे चारच सदस्य निवडून आले. भोंगळ यांनी सलग दुसऱ्यांदा बाजी मारली. मागील लढतीत त्यांच्या वहिनी शैलजा भोंगळ या सरपंच होत्या.