नागपूर: सख्ख्या भावाच्या ८ वर्षीय मुलीवर अमानुष बलात्कार करून काका फरार झाला. ही धक्कादायक घटना कोराडीत घडली. प्रमेश्वर (३४) असे आरोपीचे नाव आहे. गंभीर जखमी झालेल्या मुलीवर मेयो रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती नाजूक असल्याची माहिती आहे.
प्रमेश्वर हा मूळचा पांढूर्णा-छिंदवाडा येथील असून तो विवाहित आहे. तो बोखारा येथे एका इमारतीच्या बांधकामावर मूजर आहे. त्याने लहान भावालाही तेथे कामासाठी बोलावले. तो पत्नी व ८ वर्षीय मुलीसह नागपुरात आला. दारुडा असलेल्या प्रमेश्वर रविवारी दुपारी हा घरी होता. तर त्याचा भाऊ पत्नीसह कामावर गेला होता.
हेही वाचा… वर्धा: रेल्वे तिकिटाचा काळाबाजार! सीबीआय पथकाने केली एकास अटक
अंगणात खेळत असलेल्या ८ वर्षीय मुलीला प्रमेश्वरने घरात नेले. तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि पळून गेला. ती मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडून होती. तेवढ्यात तिची आत्या घरी आली असता घटना उघडकीस आली. त्यांनी लगेच खासगी रुग्णालयात नेले. तिचा रक्तस्त्राव जास्त झाल्याने प्रकृती बिघडली. त्यामुळे पिडीत मुलीला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी कोराडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.