अकोला : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला दोषी ठरवत १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. वि. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश गोगरकर यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला. मंगेश जानराव तायडे (२८, रा. रामगांव ता.व जि. अकोला) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी हा पीडितेचा चुलत काका आहे.
१७ जानेवारी २०२१ रोजी दुपारी १२.३० वाजता पीडिता गावातील बहिरखेड-दहीगांव गावंडे मार्गावर तुरीच्या शेंगा आणण्यासाठी एकटीच गेली होती. आरोपी हा पीडितेच्या मागे शेतात आला. त्याने पीडितेचा विनयभंग करून बलात्कार केला. पीडिता आरोपीच्या हाताला चावा घेऊन ओरडली. त्यामुळे आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.
या प्रकरणी बोरगांव मंजू पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध भा.दं.वि. कलम ३५४, ३७६, ३७६ (२) (एफ), ३७६ (३) व कलम ३, ४, ७, ८ पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले. सरकार पक्षाने एकूण १२ साक्षीदार तपासले. न्यायालयाने आरोपी मंगेश जानराव तायडे याला दोषी ठरवून १० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
हेही वाचा – चंद्रपूर : वेकोलि क्षेत्रात ‘ड्रोन’द्वारे देखरेख ठेवा, हंसराज अहीर यांचे निर्देश
तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त तीन महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच भा.दं.वि. कलम ३५४ व कलम ८ पोक्सोअंतर्गत दोषी ठरवून तीन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त एक महिना साधा कारावास भोगावा लागणार आहे. या प्रकरणात अतिरिक्त सरकारी वकील शितल भुतडा यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली.