वर्धा: पारंपारिक कुटुंबातील वर -वधूमागे हमखास दिसणारा व्यक्ती तो मामा. एरव्हीही तो पाठीशी असतोच. म्हणूनच आईप्रमाणे त्यास ए मामा, असे एकेरी संबोधल्या जाते. त्याचे असणे अनेकांना दिलासा देणारे. ही अशाच एका मामाने दिलेली साथ व भाचीने मारलेल्या भरारीची कथा.
हिंगणघाट येथील लेबर कॉलनीत राहणारे धोपटे कुटुंब. वडील प्रकाश धोपटे हे मोहता मिलमध्ये कामास. पण मिल बंद पडल्याने कुटुंबाचा आर्थिक आधारच गेला. करायचे काय हा प्रश्न. पत्नी व दोन मुली विवंचनेत म्हणून मिरची कांडप दुकान सूरू केले. मुलींनी फक्त शिकावं, कसलीच मदत करू नये ही वडिलांची भावना. मिरचीची खेस व ग्राहकांचा वावर असे वातावरण असूनही त्या शिकू लागल्या. अभ्यासात हुशार म्हणून मोठी पूजा आईला जमेल ती मदत करीत अभ्यास करीत बारावी झाली.
पुढे काय शिकायचे व कुठे, हा प्रश्न आला. तेव्हा नेहमी घरी भेट देत विचारपूस करणारा मामा धावून आला. वर्धा येथील बापूराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक राजेश राऊत यांनी पुजास वर्ध्यात नेले. त्यांच्याच महाविद्यालयात बी. ई. पदवीस प्रवेश दिला. मामा राजेश व मामी संध्या राऊत यांचे सतत प्रोत्साहन. पाहता पाहता पूजा इलेक्ट्रॉनिक्स विषयात अभियंता झाली. पण एव्हड्यात थांबायचे नव्हते. पुजाने शासकीय अधिकारी होण्याचे ध्येय ठेवले होते. तिचा मानस पाहून मामाने मग तिला पूणे येथे स्पर्धा परीक्षेच्या तयारीस पाठविले. हा आधार तिला दिलासा देणारा ठरला.खुप अभ्यास करीत तयारी सूरू केली. पण लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सलग दोनदा अपयश आले. धीर खचला तेव्हा मामा पुन्हा पाठीशी. अखेर तिसऱ्या प्रयत्नात पूजा यशस्वी झाली. महसूल अधिकारी म्हणून तिची निवड झाली. २०२३ मधील परीक्षेचा आता निकाल लागला आणि पुजाची ईच्छा सफल झाली. निकाल लागला तेव्हा पूणे येथे झालेल्या जल्लोषात पूजा न्हावून निघाली. प्रथम मामा मामीस व मग आईस आनंद वार्ता दिली. ती म्हणते स्वप्न अधिकारी होण्याचे होते. पण वाट बिकट होती. आईवडिलांचे प्रोत्साहन व मामा मामीने केलेले भक्कम सहकार्य म्हणून हे साध्य पूर्ण करू शकले. आता शासकीय सेवेत गरजू व्यक्तीस प्रथम न्याय देण्याचा प्रयत्न राहील.