लोकसत्ता टीम
नागपूर: भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राज्यपातळीवर ‘गाव चलो’ अभियान सुरू केले आहे. नागपूरमध्ये या योजनेची सुरूवात झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह बुथपातळीवरील सर्व प्रमुख आणि स्थानिक नेते त्यात सहभागी झाले. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून फडणवीस यांनी काटोल तालुक्यातील पारडशिंगा या गावाला भेट दिली. त्यानंतर हातला गावाला भेट देऊन त्यांनी ग्रामस्थांशी ‘चायपे चर्चा’ केली.
फडणवीस यांनी पारडसिंगा या गावात कार्यकर्त्यांच्या घरी रात्री मुक्काम केल्यावर गुरुवारी सकाळी हताला गांवला भेट दिली. तेथे त्यांनी ग्रामस्थ शेतकऱ्यांशी ‘चाय पे चर्चा’ केली. या दरम्यान त्यांनी शेतमाल विक्रीसह शेतकऱ्यांसाठी शासनाकडून राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती घेतली. शेतकऱ्यांनी त्यांना त्यांच्या समस्या सांगितल्या. त्या सोडवण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, ग्रामस्थांशी चर्चेमुळे माझी आजची सकाळ अधिक समृद्ध झाली. शेतकऱ्यांशी झालेल्या चर्चेमुळे त्यांनी सांगितलेल्या विविध समस्यांमुळे अनेक बाबींची माहिती झाली. त्यांच्या समस्या सोडवण्यचे आश्वासन त्यांना दिले.
आणखी वाचा-किमान समान कार्यक्रमाशिवाय आघाडी अशक्य, ॲड. प्रकाश आंबेडकरांची स्पष्ट भूमिका
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सुद्धा सावनेर तालुक्यातील धापेवाडा या गावाला भेट देणार असून ग्रामस्थांशी चर्चा करणार आहे. प्रमुख नेत्यांसोबत जिल्ह्यातील इतरही नेते विविध गावांना भेटी देणार आहे.