अमरावती : पोषण अभियान (राष्ट्रीय पोषण अभियान) अंतर्गत उपक्रमाचा एक भाग म्हणून केंद्र सरकारने  ८ एप्रिल ते २५ एप्रिल २०२५ हा कालावधी पोषण पंधरवडा (पखवाडा) म्हणून घोषित केला आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश पोषणाच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि देशभरात आरोग्य आणि निरोगीपणाला प्रोत्साहन देणे आहे. या कालावधीत विविध उपक्रम राबविण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिले आहेत. आधीच अशैक्षणिक कामांचा भार असताना नवीन आदेश आल्‍याने शिक्षकांमध्‍ये नाराजीचा सूर उमटला आहे.

पोषणाच्या महत्त्वाबद्दल जनजागृती, निरोगी जीवनशैलीसाठी संतुलित आहाराची सवय आणि मिशन पोषण २.० अंतर्गत शाळांमध्ये राबविण्यासाठी जागरूकता कार्यक्रम, त्‍यात संतुलित आहार, पोषण, आरोग्य याविषयी संवादात्मक व्याख्याने व चर्चासत्रे,तज्ञ व्याख्याते, आरोग्य कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन, कार्यशाळा व चर्चासत्रे तसेच शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी पोस्टर्स, स्किट कर्स, व्हिडिओ तयार करणार,पोषणाशी संबंधित माहितीचा प्रचार व प्रसारित करणे, स्वदेशी खेळण्यांचा मेळावा, अंगणवाडी सेविकांबरोबर ‘डीआयवाय’ उपलब्ध वस्तू व साहित्यापासून खेळणी बनवण्याच्या कार्यशाळा, चित्रकला, निबंध लेखन, भाषण व प्रश्नमंजुषा स्पर्धा, शाळा व्‍यवस्‍थापन समितीच्‍या बैठकांमधून कुटुंबातील खाण्याच्या सवयी, पौष्टिक आहार यावर चर्चा, घरचे आरोग्यदूत संकल्पना हे उपक्रम राबविण्‍याच्‍या सूचना आहेत.

विद्यार्थ्यांना पारंपारिक अन्न आणि स्थानिक कृषी पद्धती तसेच परसबागेतील विविध भाजीपाला व याबद्दल शिकण्यास प्रोत्साहित करावे, विद्यार्थी विकासावर होणारा परिणाम याबाबत विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या सक्रिय सहभागाला प्रोत्साहन देण्यात यावे. पोषण पखवाडा या काळात शाळांनी राबविलेल्या विविध उपक्रमांचा अहवाल तयार करण्यात यावा. यामध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमांची माहिती, सहभागी विद्यार्थी आणि पालकांची संख्या आणि इतर कोणत्याही उल्लेखनीय बाबींचा समावेश करण्यात येऊन प्राथमिक शिक्षण संचालनालयास सादर करण्यात यावा, असे सांगण्‍यात आले आहे.

नवीन वर्षात उपक्रम घ्‍या…

सध्‍या सर्व शाळांमध्‍ये संकलीत चाचणी सुरु झाली आहे. उन्हाचा पारा वाढत आहे. विद्यार्थ्‍यांनी परीक्षेची तयारी करावी की अशा उपक्रमात सहभाग घ्यावा, हा प्रश्‍न आहे. सध्‍या  मुख्याध्यापक व शिक्षक यांच्यावर विविध उपक्रमाचा भार आहे. ऑनलाईन माहीती, नवभारत साक्षरता, निपूण भारत उपक्रम, नवगतांचे स्वागत, मेळावे, शिक्षण परीषदा याचा भार पडत आहे. परीक्षेचा निकाल तयार करण्‍याचे काम करावे लागणार आहे. नवीन शैक्षणिक सत्रापासून अशा प्रकारचे उपक्रम राबवावेत, अशी विनंती महाराष्‍ट्र राज्‍य प्रा‍थमिक शिक्षक समितीचे राज्य प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर यांनी केली आहे.