नागपूर: नागपूर शहरातील प्रतिभावंत खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक प्राप्त खेळाडूंकरिता उडान खेल प्रोत्साहन योजने’च्या माध्यमातून महापालिकेद्वारे ७४ खेळाडूंना ५७ लक्ष ८९ हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्यात आले.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या पुढाकारातून ‘उडान खेल प्रोत्साहन योजना सुरु झाली आहे. या माध्यमातून महापालिकेद्वारे खेळाडूंना आर्थिक सहाय्य मिळण्यास सुरुवात झाली आहे. यापूर्वी योजनेचा जास्तीत जास्त खेळाडूंना लाभ मिळावा याकरिता मनपाद्वारे शहरातील सर्व क्रीडा संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती.

‘उडान खेल प्रोत्साहन योजने’चे अर्ज करण्यासाठी महापालिकेतर्फे अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार ७४ खेळाडू विविध प्रोत्साहन पुरस्कारासाठी पात्र ठरले. महापालिकातर्फे या खेळाडूंना आता आर्थिक सहाय्य मिळाले आहे.

मागील तीन वर्षांच्या कालावधीत नागपूर शहरातील आंतरराष्ट्रीय पदक प्राप्त १० खेळाडूंना प्रत्येकी २ लक्ष रुपये प्रोत्साहन पुरस्कार देण्यात आले. यात नाकाडे शाश्रुती विनायक (ट्रायथलॉन), मालविका प्रबोध बन्सोड (बॅडमिंटन), अल्फिया तरन्नुम पठाण (बॉक्सिंग), स्नेहल सुनील जोशी, संजान सुनील जोशी (ट्रायथ्लॉन), मृदुल विकाल डेहनकर, दिव्या जितेंद्र देशमुख, रोनक भारत साधवानी(सर्व बुद्धिबळ),जेनीफर वर्गिस (टेबल टेनिस), ओजस प्रवीण देवतळे (आर्चरी) यांचा समावेश आहे.

आंतराष्ट्रीय स्पर्धात सहभाग असलेल्या दोन खेळाडूंना प्रत्येकी एक लाख रुपये प्रोत्साहन पुरस्कार दिले जाणार आहे. यात मृणाली प्रकाश पांडे ( बुद्धीबळ), सिया देवधर (बास्केटबॉल) यांचा समावेश आहे.