नागपूर : मैत्रिणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणाने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र, मैत्रीण गर्भवती झाल्यानंतर त्यांचे प्रेमप्रकरणाचे बिंग फुटले. मैत्रिणीच्या आईने मुलीला थेट पोलीस ठाण्यात नेले. आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुलीच्या मित्रावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. सिद्धार्थ हरिश्चंद्र देशभ्रतार (२४, वाठोडा) असे आरोपीचे नाव आहे. त्याची एका १७ वर्षीय मुलीशी मैत्री होती. त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.
हेही वाचा – अमरावती : चारित्र्यावर संशय घेऊन मुलानेच केली आईची हत्या; लहान भावालाही संपविले
मे महिन्यात तिच्या घरी कुणीच नसल्याचा फायदा उचलत त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर अनेकदा त्याने वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार केला. काही दिवसांअगोदर मुलीच्या पोटात वेदना होऊ लागल्या. तिच्या पालकांनी तिला मेडिकल रुग्णालयात नेले असता ती गर्भवती असल्याची बाब समोर आली. पालकांनी विचारणा केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. पालकांनी केलेली तक्रार व वैद्यकीय सूचनेवरून वाठोडा पोलीस ठाण्यात आरोपी सिद्धार्थविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.