नागपूर : नागपूर मध्यवर्ती कारागृहातील अंडरट्रायल असलेल्या कुख्यात गुन्हेगाराने मेडिकल इस्पितळातील पोलीस चौकीजवळ राडा केला.त्याने स्वत:चेच डोके रॉडवर आपटून घेत पोलीस कर्मचाऱ्यांचा मोबाईल हिसकावला. नातेवाईकांना भेटू न दिल्यामुळे संतप्त झाल्यामुळे त्याने हा राडा केला. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
सलमान खान शमशेर खान (२७) असे आरोपीचे नाव असून तो कुख्यात गुंड आहे. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून तो सध्या कारागृहात अंडर ट्रायल कैदी म्हणून आहे. गुरुवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास पोलीस कर्मचारी किशोर वाडीभस्मे त्याला मध्यवर्ती कारागृहातून मेडिकलमध्ये उपचारासाठी घेऊन गेले.
त्यावेळी इतर कैदी व पोलीस कर्मचारीदेखील होते. सलमान खानचे नातेवाईक तेथे पोहोचले व त्याला खाद्यपदार्थ तसेच इतर साहित्य देण्याचा प्रयत्न केला. यावर वाडीभस्मे यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर शासकीय वाहनातून मध्यवर्ती कारागृहात परत जायचे असल्याने ते सलमानला मेडिकलच्या पोलीस चौकीजवळ घेऊन गेले. तेथे सलमानने त्यांना तसेच सोबत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांना अश्लिल शिवीगाळ सुरू केली.
तुम्हाला माझा रेकॉर्ड माहिती नाही. तुम्ही मला खाद्यपदार्थ व चप्पल घेऊ दिली नाही आणि माझ्या नातेवाईकांशी भेटू दिले नाही. मी तुम्हाला फसवतोच, असे म्हणून त्याने चौकीबाहेरील खिडकीवर दोन ते तीन वेळा स्वत:चे डोके आपटून घेतले.
पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला तसे करण्यापासून परावृत्त केले. मात्र त्याने एका महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या हातातील मोबाईल हिसकाविण्याचा प्रयत्न केला. त्याने शासकीय कामात अडथळा आणल्याची तक्रार वाडीभस्मे यांनी अजनी पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पूर्वी मध्यवर्ती कारागृह कैद्यांच्या गोंधळामुळे प्रकाश झोतात आले होते, परंतु गेल्या काही महिन्यांपासून मध्यवर्ती कारागृहात शांततेचे वातावरण आहे. मात्र कारागृहातून रुग्णालयात उपचार घेण्यासाठी बाहेर आलेले कैदी गोंधळ घालण्याचे अनेक प्रकार समोर आलेले आहेत. याप्रकरणी अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.