अकोला : अकोला जिल्हा परिषदेवर वंचित बहुजन आघाडीने आपले निर्विवाद वर्चस्व राखले आहे. अध्यक्षपदी वंचितच्या संगीता अढाऊ, तर उपाध्यक्षपदी सुनील फाटकर यांची निवड झाली. वंचितची सत्ता कायम राखण्यात भाजपच्या सदस्यांनी गैरहजर राहून अप्रत्यक्षरित्या हातभार लावला. अकोला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्याने नव्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड करण्यासाठी आज जिल्हा परिषदेच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. वंचितकडून अध्यक्षपदासाठी संगीता अढाऊ, तर महाविकास आघाडीकडून किरण अवताडे यांनी अर्ज दाखल केला. उपाध्यक्ष पदासाठी वंचितकडून सुनील फाटकर यांनी अर्ज दाखल केला.
५३ सदस्यसंख्या असलेल्या अकोला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वंचितच्या संगीता अढाऊ २५ मते घेऊन विजयी झाल्या. मविआच्या उमेदवाराला २३ पदे पडली. उपाध्यक्षपदी सुनील फाटकर ही २५ मते घेऊन निवडून आले. भाजपचे पाच सदस्य गेल्या वेळेसप्रमाणे गैरहजर राहिले. त्यामुळेच वंचितच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला.