समृद्धी महामार्गावरील अपघातांची दुर्दैवी मालिका संपायची चिन्हे नाहीत. खास ईदसाठी आपल्या अमरावती जिल्ह्यातील मूळ गावी जाण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबाच्या कारला आज शुक्रवारी( दि २१) सावरगाव माळ शिवार परिसरात( चॅनल३४६.५) ही अपघात झाला. यात एका इसमाचा मृत्यू झाला असून तिघे जखमी झाले आहेत.
आज ‘चाँद’ दिसणार होता, उद्या ईद साजरी केली असती. पण, या वेगवान महामार्गाने एका कुटुंबाचा आनंदच हिरावून घेतला. समृद्धी महामार्ग नागपूर कॉरिडॉरवर वर( युपी ६१ /एटी / २६०८ क्रमांकाचा) ट्रक आपल्या लेन वरून जात होता. या ट्रकला ओव्हरटेक करीत असताना नियंत्रण सुटल्यामुळे (एम एच ०२/ एफ इ /८८७६ क्रमांकाची) भरधाव इनोव्हा कार ट्रकवर धडकली. यात डॉ अब्दुल खालिक( वय ५२) यांचा जागीच मृत्यू झाला. डॉ अब्दुल यांची मुलगी मुस्कान (वय २४) ही गंभीर जखमी झाली. दुसरा मुलगा अमन व पत्नी अमरीन हे दोघे जखमी झाले आहे. अब्दुल हे मुंबई वरुन अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील येवदा या आपल्या मूळ गावी जात होते.
हेही वाचा >>> नागपूर : जगातील सर्वात लहान चरखा, लांबी ३.२० मिमीची, सूतही काढता येतं
नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना जालना येथील खासगी रुग्णालयात हलविले. महामार्ग पथकाचे पोलीस निरीक्षक शैलेश पवार, उपनिरीक्षक उज्जैनकर, राणे, राठोड यांनी बचाव कार्य केले. याप्रकरणी कार चालक दिनेश कुमार विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.