कर्मचाऱ्यांच्या अन्नात अळ्या, उंदराची विष्ठा वाढणाऱ्या उपाहारगृहावर सिडको प्रशासन मेहरबान झाले असून कोणतीही परवानगी न घेता हे उपाहारगृह पुन्हा सुरू करण्यात आले आहे. प्रशासनात असलेल्या दाक्षिणात्य लॉबीमुळे निकृष्ट अन्न देणाऱ्या या उपाहारगृहाला सिडको पाठीशी घालत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
सिडकोच्या बेलापूर येथील मुख्यालयाच्या तळमजल्यावर असलेल्या उपाहारगृहातील प्राईड राईसमध्ये एका कर्मचाऱ्याला दुपारच्या जेवणात अक्षरश: अळ्या सापडल्या. कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या उपाहारगृहाच्या स्वयंपाकघराची झाडाझडती घेतली असता त्यात उंदरांची विष्ठा, पाल फिरताना आढळून आल्या. अस्वच्छता तर या उपाहारगृहाच्या पाचवीला पुजल्याचे चित्र होते. सिडको उत्तम प्रशासन व पारदर्शक कारभाराचा ढिंढोरा सध्या सर्वत्र पिटत असताना उपाहारगृहातील ही अस्वच्छता हजारो कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळणारी होती. उपाहारगृहात आढळून आलेल्या अळ्या, विष्ठा सरपटणाऱ्या प्राण्याचे साम्राज्य पाहता प्रशासनाने या उपाहारगृहाचे मालक कमलाकर शेट्टी यांना एक खुलासा करणारी नोटीस बजावली होती. त्यामुळे दोन दिवस हे उपाहारगृह बंद ठेवून स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर ते पुन्हा सुरू करण्यात आले आहे. सिडकोने नावाला या उपाहारगृहातील अन्नाची तपासणी करण्यासाठी पाच जणांची समिती स्थापन केली आहे. त्यांचा अहवाल अद्याप हाती आलेला नाही. तसेच हे उपाहारगृह पुन्हा सुरू करण्याचे कोणतेही आदेश प्रशासनाने दिलेले नाहीत. असे असताना मालकाने हे उपाहारगृह सुरु केले आहे, याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
सिडकोचा कारभार सध्या कडक शिस्तीचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांच्या देखरेखेखाली सुरू आहे. अशा वेळी हलगर्जीपणा किंवा भ्रष्टाचार करणाऱ्या कर्मचारी आढळून आल्यास त्याला तात्काळ घरचा रस्ता दाखविला जात आहे, पण अळ्या आणि अस्वच्छ स्वयंपाकघर ठेवणाऱ्या उपाहारगृह कंत्राटदारावर सिडकोचे उच्च पदाधिकारी मेहरबान झाल्याचे चित्र आहे.
उपाहारगृहातील अन्नात अळ्या आणि विष्ठा आढळून आल्यानंतर कंत्राटदाराला बडतर्फ करणे अभिप्रेत आहे. त्याबाबत चौकशी केली जाणार असून कंत्राटदाराला देण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटिसीची मुदत पडताळून पाहिली जाणार आहे. त्यानंतर कारवाईचे आदेश दिले जातील.
-व्ही.राधा. सहव्यवस्थापकीय संचालिका, सिडको

कंत्राटदाराला पाठीशी घालण्यासाठी दाक्षिणात्य लॉबीचा प्रयत्न
कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या या उपाहारगृहाचे अन्न व औषध प्रशासनाचे परवाने तपासण्यात आलेले नाहीत. सिडकोत एक दाक्षिणात्य लॉबी बरीच वर्षे बडय़ा पदांवर कार्यरत आहे. त्यामुळे या उपाहारगृहाच्या कंत्राटदाराची एक मक्तेदारी गेली कित्येक दिवस असल्याचे दिसून येते. त्यामुळे थातूरमातूर स्वच्छता करून या मालकाने प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता उपाहारगृह सुरू केले आहे. वास्तविक या उपाहारगृह कंत्राटदाराला बडतर्फे करणे अपेक्षित होते, पण दाक्षिणात्य कंत्राटदाराला पाठीशी घालण्यासाठी सर्व दाक्षिणात्य लॉबी एकटवल्याचे चित्र होते. विशेष म्हणजे बलाढय़ कामगार संघटना म्हणणाऱ्या सिडको कामगार संघटनेची भूमिकाही मवाळ आहे. या उपाहारगृहात २४ कर्मचारी आहेत. कंत्राटदार बदलला तरी या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करता येत नाही. त्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊनच दुसऱ्या कंत्राटदाराला हे काम करावे लागणार आहे. कर्मचाऱ्यांपैकीही बहुतांशी कर्मचारी हे दाक्षिणात्य असल्याने ते नवीन कंत्राटदाराला सहकार्य करीत नसल्याचे समजते.

Story img Loader