गोंदिया: जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात केशोरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या राजोली हद्दीतील वनविकास महामंडळच्या (एफडीसीएम) जंगल परिसरात पाथर गोटा नजीकच्या उजव्या बाजूला एका (अंदाजे ४० ) वर्षीय अनोळखी महिलेचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत आढळले असल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली.
मृत महिलेचा दोन दिवसापूर्वी मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज शवविच्छेदन करणाऱ्या वैद्यकीय पथका कडून वर्तविला जात आहे.
प्राप्त माहितीनुसार वनविकास महामंडळ (एफ डी सी एम) कक्ष क्रमांक ३३७ येथील जंगल परिसरात लाकडी बिट तोडून व ते ट्रॅक्टर आणि ट्रक मध्ये भरून वाहतूक करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान कापलेले बिट लाकडे ट्रॅक्टर ट्रॉलीत भरण्यासाठी गेलेल्या मजुरांना त्या मृत महिलेचे प्रेत आढलून आले. या घटनेची माहिती मजुरांकरवी सबंधित वनकर्मचारी यांना देण्यात आली.
वन कर्मचाऱ्यांनी त्वरित घटनेची माहिती केशोरी पोलिसांना दिली .काही वेळातच घटना स्थळी केशोरी पोलीस आणि शव विच्छेदन करिता वैद्यकीय अधिकारी दाखल झाले. सदर महिलेचे प्रेत हे दोन दिवसांपूर्वीचे असल्यामुळे कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने केशोरी पोलिसांनी मृत महिलेचा पंचनामा आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन करून घटना स्थळाच्या बाजूलाच मृत महिलेचे शरीर दफन करण्यात आले.
केशोरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत महिला ही बऱ्याच दिवसा पासून वेडसर असल्याने याच वनविकास महामंडळच्या जंगल परिसरात हातात कापडाची पिशवी घेऊन भटकत राहत होती. तीव्र उन्हाळ्याचे दिवस असल्याने सदर महिलेचा मृत्यू भूक आणि तहानेने झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. पुढील तपास सुरू आहे.घटना स्थळी केशोरी पोलीस स्टेशनचे भोसले ,पो.ना. मेश्राम ,पो.ना भांडारकर,पो.शी. मारबते, महिला पोलिस शिपाई मारबते आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यासह वन कर्मचारी उपस्थित होते.
अश्याच प्रकारे गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यात देऊटोला/बबई शेतशिवारात १० फेब्रुवारी २०२५ रोजी एका तरुणीचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला होता. या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी गुन्हा नोंद करून गोंदिया येथील शकील मुस्तका सिद्दीकी (३८) राहणार मामा चौक सिव्हिल लाईन यास ताब्यात घेतले होते.
दरम्यान, पोलिस तपासात सदर तरुणी आपल्याच वीटभट्टीत मजूर म्हणून कामाला होती तिच्याशी आपले अनैतिक संबंध असून त्यातून ती गर्भवती झाली. त्यामुळे तिचा ओढणीने गळा आवळून खून केला व तिला जाळल्याचे आरोपी शकील सिद्दीक याने गोरेगाव पोलिसा समोर कबूल केले होते. केशोरी पोलिसांनी पण जंगल परिसरा जवळील गावात सदर मृत महिला कुणाच्या ओळखीची आहे की काय या बाबत तपास सुरू केला आहे.