नागपूर: केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी. किशन रेड्डी हे गुरूवारी (१३ फेब्रुवारी २०२५) भारतीय खाण मजदूर संघाच्या रेशीमबागमधील डॉ. हेडगेवार स्मृती भवनातील अधिवेशनासाठी नागपुरात आले होते. यावेळी त्यांनी उपाशी राहणार, परंतु वीज नसल्यास कठीण आहे, असे वक्तव्य केले. औष्णिक विद्युत प्रकल्पातील कोळशाबाबतही त्यांनी बरीच महत्वाची माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंचावर भारतीय मजदूर संघाचे उपमहामंत्री सुरेंद्र कुमार पांडे, कोळसा उद्योग प्रभारी के. लक्ष्मा रेड्डी, अखिल भारतीय खाण कामगार संघटनेचे अध्यक्ष टिकेश्वरसिंह राठोड, सुधीर घुरडे उपस्थित होते. केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी. किशन रेड्डी अधिवेशनात म्हणाले, भारत आंतराळ, माहिती तंत्रज्ञानासह विविध क्षेत्रात झपाट्याने प्रगती करीत आहे. त्यामुळे विजेची मागणीही झपाट्याने वाढत आहे. भारतात आजही ७४ टक्के वीज ही औष्णिक विद्युत प्रकल्पातून तयार होते. येथे कोळशाशिवाय वीज तयार होणे शक्य नाही. त्यामुळे दोन दिवस वीज नसल्यास मोबाईल, वातानुकुलीत यंत्रासह कोणतेही विद्युत उपकरण चालू शकत नाही. अशा स्थितीत दोन दिवस उपाशी राहू शकू, पण वीज नसल्यास कठीण आहे.

यंदाच्या वर्षी कोळशाचे उत्पादन १ हजार मिलियन टनचे लक्ष निश्चित केले आहे. आणखी दोन महिने शिल्लक असून कोळसा उत्पादन मागच्या वर्षीहून वाढणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी जयंत आसोले, सुरेश चौधरी आणि इतर प्रयत्न करत आहे.

कामगार हिताकडे लक्ष देणार…

वीज उत्पादन वाढवण्यासाठी कोळशाची गरज आहे. परंतु उत्पादन वाढवतांना खाण कामगारांच्या हिताकडेही लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी केंद्र सरकारने या कामगारांना वीमा संरक्षण दिले आहे. या वीमा संरक्षणात खाण कामगारांच्या मुलांच्या शिक्षण, कौटुंबिक आरोग्य, क्रेडिट कार्डसह इतरही सोयींचा समावेश करण्यात आल्याचीही माहिती जी. किशन रेड्डी यांनी दिली. दरम्यान खाण कामगारांना लवकरच नवीन गणवेश कोल कंपन्यांकडून उपलब्ध करण्यासह हे गणवेश धुन्यासाठीचाही निधी कोल कंपन्यांकडून देण्याबाबत विचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोळसा उत्पादन व वापरात भारत जगात दुसरा

कोळशाचे उत्पादन आणि कोळशाच्या वापरामध्ये भारत हा चीन या देशानंतर जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशात सर्वाधिक वीज उत्पादनही कोळशावर आधारित औष्णिक विद्युत प्रकल्पातून होत असल्याने कोळसा उद्योग हा देशातील महत्वाचा भाग असल्याचेही केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले.