नागपूर : मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या तीन चित्त्यांचा आणि भारतात जन्मलेल्या तीन बछड्यांच्या मृत्यूची जबाबदारी अखेर केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी स्वीकारली. मात्र, त्याचवेळी भारतातील चित्ता स्थलांतरण प्रकल्पाला मोठे यश मिळेल, असा आशावाददेखील त्यांनी व्यक्त केला.

चित्त्यांच्या मृत्यूनंतर कुनोतील त्यांचा अधिवास, व्यवस्थापन, चित्त्यांसाठी अपुरी शिकार यावर तज्ज्ञांकडून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. तर या प्रकल्पातील प्रमुख तज्ज्ञाने या धोक्यांचा आधीच इशारा दिल्यानंतरही त्यांना प्रकल्पातून बाजूला सारले गेले, यावरूनही बरीच टीका झाली. त्यावर आता केंद्र सरकारने सारवासारव सुरू केली आहे.

हेही वाचा – नागपूर : हवामानाने बदलले रंग, मान्सूनपूर्व पावसाच्या सरी नाही, तर…..

हा आंतरराष्ट्रीय प्रकल्प असल्याने मृत्यूचा अंदाज होता. भारतात येण्यापूर्वीच एक मादी चित्ता आजारी होती. तर इतर दोघांच्या मृत्यूची कारणेही माहिती आहेत. चित्त्याच्या बछड्यांना मात्र येथील वाढत्या तापमानाचा फटका बसला. त्यामुळे जे काही घडले त्याची जबाबदारी आमची आहे. मात्र, हा प्रकल्प यशस्वी होईल आणि देशाला त्याचा अभिमान वाटेल, असेही भूपेंद्र यादव म्हणाले.

Story img Loader