बुलढाणा : ‘मिशन ४५’ अंतर्गत बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील आपल्या पहिल्या दौऱ्यात केंद्रीय श्रम, वनमंत्री भूपेंद्र यादव यांनी रविवारी बैठकींचा सपाटा लावला. त्यांनी खामगाव मतदारसंघात आयोजित विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांसह विविध समाजघटकांचे विचार ऐकून घेत आपल्या मार्गदर्शनात ‘शत प्रतिशत भाजप’वर भर दिला. बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा भावी खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींना साथ देणाराच असेल, असा आत्मविश्वासही त्यांनी बोलून दाखवला.
ना. यादव यांनी रविवारी देऊळगाव राजामध्ये उदयकुमार छाजेड यांच्या निवासस्थानी जनसंघाच्या कार्यकर्त्यांसोबत भेट व अल्पोपाहार घेतल्यावर ते खामगावकडे निघाले. सकाळी खामगावच्या ऐतिहासिक टिळक राष्ट्रीय विद्यालयाला त्यांनी भेट देऊन व्यवस्थापन व अध्यापकांशी चर्चा केली. दुपारी रोहणा येथील सेवा सप्ताह शुभारंभ व रक्तदान शिबिरात उपस्थिती लावल्यावर एक वाजताचे सुमारास आमदार आकाश फुंडकर यांच्यासोबत भोजन घेतले. काही क्षण विसावा घेतल्यावर ना. यादव यांनी संघटनात्मक कार्यक्रमात मार्गदर्शन केले.
हेही वाचा : अशोक चव्हाण काँग्रेस सोडणार या निव्वळ वावड्या – बाळासाहेब थोरात
यानंतर भाजप लोकसभा कोअर समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीतील तपशील मिळू शकला नाही. यानंतर युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतल्यावर त्यांनी बुलढाणा लोकसभेच्या क्षेत्र लाभार्थ्यांना कोल्हटकर स्मारक मंदिर येथे मार्गदर्शन केले. यापाठोपाठ हरी लॉन्स येथे मतदार आणि सामाजिक कार्यकर्ते, सहकारी संस्थेचे पदाधिकारी, व्यापारी, उद्योजक, डॉक्टर, वकील व नवीन मतदार तर लगतच्या बैठकीत मिसाबंदी व कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली. आ. फुंडकर यांच्या निवासस्थानी भोजन घेतल्यावर जिल्हा परिषद सदस्य, सरपंच व इतर लोकप्रतिनिधींसोबत व नंतर एस पी ९५ राष्ट्रीय निवृत्ती वेतन समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली.
पंतप्रधान मोदींना साथ देणाराच खासदार हवा!
ना. यादव यांच्या बहुतेक बैठका गुप्त स्वरूपाच्या असल्याने त्यातील तपशील कळू शकला नाही. मात्र, यादव यांनी बुलढाण्याचा पुढील खासदार भाजपचाच, पंतप्रधान मोदींना साथ देणाराच हवा आणि राहणारच, असे ठामपणे सांगितल्याचे समजते. आतापासून घरोघरी पोहोचून कार्यकर्त्यांनी केंद्राच्या कल्याणकारी योजना सामन्यापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी केल्याचे सांगण्यात आले.