बुलढाणा: मिशन -४५ अंतर्गत बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची विशेष जवाबदारी असलेले केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव पाचव्यांदा मतदारसंघात येत आहेत. या मुक्कामी दौऱ्यात ते राष्ट्रवादी (अजित पवार) चा बालेकिल्ला असलेल्या सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचा अप्रत्यक्षपणे धांडोळा घेणार आहेत. तसेच संग्रामपूर व खामगाव मतदारसंघात ‘प्रवास’ करणार आहेत.
वरकरणी हा दौरा भारत संकल्प यात्रेनिमित्त असला तरी त्यामागे छुपा राजकीय अजेंडा आहे. भाजपची बुलढाणा लोकसभेवर ‘नजर’ आहे ही बाब अगदी सामान्य मतदार व कार्यकर्त्यांनाही ठाऊक आहे. पंतप्रधानांचे विश्वासू ना. यादव यांच्या आजवरचा प्रवास उमेदवारी च्या दृष्टीने शोध घेणारा आणि शिंदे गटाचे खासदार जाधव यांची ‘राजकीय स्थिती’चे मूल्यांकन करणारा ठरला आहे. स्वपक्षीय नेत्यांसह भाजपा सुकाणू समिती सोबत त्यांनी दरवेळी या विषयावर खलबते केली आहे. आता उमेदवारी ठरविण्याच्या निर्णायक वेळेवर ते जिल्ह्यात येत असल्याने त्यांची पाचवी भेट निर्णायक ठरली आहे. त्यांच्या प्रत्येकी भेटीने शिंदे प्रामुख्याने खासदार गटाची धाकधूक वाढविली . शिंदे गट वा खा. जाधव यांना भाजपाच्या वतीने जाहीररीत्या उमेदवारीची खात्री देण्यात आलेली नाहीये! त्यामुळे सरत्या वर्षात खासदार सारख्या मुरब्बी नेत्यावरील दडपण कायम ठेवण्यात धूर्त भाजप यशस्वी ठरली. नवीन वर्षातील ना. यादव यांचा पहिला प्रवास सुद्धा याला अपवाद नाही.
हेही वाचा… कायद्याचा बडगा अन् यादवकालीन पाषाणमूर्ती अखेर पुरातत्व खात्याकडे
या दौऱ्यात खासदार प्रतापराव जाधव, अजितदादा गटाचे आमदार राजेंद्र शिंगणे, भाजप आमदार संजय कुटे, आकाश फुंडकर, श्वेता महाले पाटील हे तिन्ही घटक पक्षांचे नेते सहभागी होणार आहे. लोकसभेत समाविष्ट नसलेल्या नेत्यांना कटाक्षाने दूर ठेवण्यात आले आहे. अलीकडे त्यांच्या दौऱ्यात आक्रमक आमदार श्वेता महाले यांना देण्यात येणारे महत्व लक्षवेधी व चर्चेचा विषय ठरला आहे.