वर्धा : लोकांच्या मनातले व त्यांच्या सोयीचे काम झाले की जगण्यास बळच मिळते. लोकांची अशी भावना ओळखून काम मार्गी लावणारे मग लोकप्रिय होतात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे जाणारा सहसा विन्मुख होत परत येत नाही, असे म्हटल्या जाते. तोच प्रत्यय हिंगणघाट तालुक्यातील सुप्रसिद्ध संत भोजाजी महाराज देवस्थानच्या विश्वस्त मंडळीस आला आहे. हे देवस्थान पुरणपोळीच्या नैवैद्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे संपूर्ण विदर्भातील भाविक येथे येऊन पुरणपोळीचा स्वयंपाक करतात. प्रत्येक महिन्यास येथे ५ लाखांवर भक्तांची हजेरी लागत असल्याची नोंद आहे.
पण भक्तांची येथे येण्याची वाट सोपी नाही. त्यात पावसाळा आला की अधिकच अडचणी वाढते. ही वाट सोयीची व्हावी म्हणून अनेक वर्षांपासून प्रयत्न सूरू आहे. विविध नेत्यांकडे पाठपुरावा झाला. पण काम झाले नाही. तसेच वर्धा नदीवरील रोहिणी घाटावर पूल नसल्याने मोठा फेरा मारून दर्शन घेण्यास यावे लागते. यवतमाळ, अमरावती जिल्ह्यातील भाविकांना तर ५० किलोमीटरचा फेरा पडतो.
आता मार्ग निघणार
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अखेर मार्ग काढला आहे. त्यांनी केंद्रीय निधीतून ३८ कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे.तसे पत्र देवस्थान समितीस प्राप्त झाले. अध्यक्ष डॉ. विजय पर्बत, सचिव शिवदास पर्बत, उपाध्यक्ष धनराज मेश्राम तसेच विश्वस्त राजेंद्र ढवळे, नामदेव गाढवे, रमेश ठाकरे, रामाजी कोपरकर,विनोद आष्टाणकर, शालिनी इखार, महेश कोसूरकर, सरपंच श्रावण काचोळे, उपसरपंच नरेंद्र पाटील आदिनी गडकरी यांचे आभार मानले आहे. परिसरातील आजनसारासह हिवरा, फुकटा, वडनेर, दारोडा,वरणगाव, सिरसगाव, मणसावली, कान्होली, टाकळी व अन्य काही ग्रामपंचायतीद्वारे पूल बांधून देण्यासाठी पूर्वीच ठराव होऊन चुकले आहे.
डॉ. पर्बत यासंदर्भात बोलतांना म्हणाले, पुलाच्या कामासाठी खूप पाठपुरावा करावा लागला. एकदा पूर्वी मंजूर झाले. पण तांत्रिक कारणास्तव नामंजूर करण्यात आले. खरे मार्गी लागले ते ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांनी शब्द टाकल्याने. त्यांनी पत्र पण दिले आणि स्वतः गडकरी यांच्यासोबत बोलले. हे पत्र पाहून गडकरी यांनी लगेच ‘टॉप प्रायोरिटी’असा शेरा दिला होता. काम लवकरच मार्गी लागणार. तसेच पुलासोबतच मुख्य मार्गाला जोडणारे ५०० मिटरचे दोन रस्ते पण बांधून दिल्या जाणार आहेत. कष्टाचे चीज झाले, अशी सर्वांची भावना आहे.