नागपूर : रोजगार वाढवणारी स्वस्त भांडवल निर्मिती, सुलभ आर्थिक धोरण याआधारे भारताला स्वत:च्या सोयीचे आर्थिक धोरण आखावे लागेल. या धोरणांवरच आत्मनिर्भरता अवलंबून असेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डॉ. दंदे फाऊंडेशन आणि राजहंस प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यामाने ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांच्या ‘मेड इन चायना’ या पुस्तकाचा लोकार्पण सोहळा आणि ‘स्वत:ला साम्यवादी म्हणवणाऱ्या चीनच्या आधुनिक प्रगतीचे प्रारुप’ या विषयावर गिरीश कुबेर यांचे व्याख्यान वनामती सभागृहात शनिवारी आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

व्यासपीठावर विशेष अतिथी म्हणून एअर मार्शल (निवृत्त) एस.बी.देव, डॉ. दंदे फाऊंडेशनचे डॉ. पिनाक दंदे, राजहंस प्रकाशनचे नरेश सब्जीवाले होते. भारताला रोजगार निर्माण करणाऱ्या आणि आर्थिक, सामाजिक विषमता दूर करणाऱ्या अर्थव्यवस्थेची गरज आहे. आयात कमी करुन निर्यात वाढवू, तेव्हाच अर्थव्यवस्था उत्तम होईल. त्यासाठी तंत्रज्ञानाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे गडकरी म्हणाले.

हेही वाचा >>>लक्ष मनांच्या इंद्रगुहांत भटकणारा तो चंद्र…!

गिरीश कुबेर म्हणाले, चीनच्या धोरणाचे अनुकरण करुन होणार नाही, तर आपल्याला स्वत:च्या सोयीची अर्थरचना उभी करावी लागेल. आपण चायनीज वस्तुंवर बहिष्कार घाला असे म्हणतो, पण मेट्रोच्या बांधणीसाठी लागणारी सामग्री चीनची आहे. भारतातील सर्वात मोठ्या बंदर व्यवस्थेतील कंटेनर हाताळणारी क्रेन चायनाची आहे. चीनने आर्थिक आव्हान पेलले, पण भारताच्या आर्थिक धोरणात अजूनही पोकळी आहे. ती कशी भरुन काढायची हा प्रश्न आहे.

यावेळी एस.बी. देव यांनी त्यांच्या कार्यकाळातील अनेक दाखले देत चीनच्या प्रगतीवर भाष्य केले. प्रास्ताविक डॉ. पिनाक दंदे व संचालन बाळ कुळकर्णी यांनी केले. नरेश सब्जीवाले यांनी आभार मानले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Union minister nitin gadkari asserted that self reliance depends on easy economic policy amy
Show comments