नागपूर: वर्धा जिल्ह्यात बांबूपासून औष्णिक विद्युत प्रकल्पाला वीजनिर्मितीसाठी कोळशासारखा उपयोग होईल असा पांढरा कोळसा तयार करण्यात आला आहे. त्याचा वापर वाढल्यास उसाच्या दरात बांबूची विक्री होईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
नागपुरात ॲग्रोव्हिजन कृषिप्रदर्शनाचा सोमवारी समारोप झाला. याप्रसंगी मंचावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अरुणाचल प्रदेशचे कृषिमंत्री टागे टाकी, उत्तर प्रदेशचे कृषिमंत्री सूर्यप्रताप साही, खासदार रामदास तडस, दादाराव केचे, हरीश पिंपळे, टेकचंद सावरकर आणि इतर उपस्थित होते. गडकरी म्हणाले, वर्धेतील एकाने बांबूला विशिष्ट आकारात कापण्याचे यंत्र तयार केले. त्याचे प्रदर्शन येथे आहे.
हेही वाचा… संत्र्याच्या आयात शुल्कातील निम्मा भार शासनाकडून; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
सदर बांबूचा उष्मांक ४ हजार आहे. त्यावर चांगली वीज तयार होणे शक्य आहे. या पांढरा कोळशाचा वापर वाढल्यास बांबूची मागणी वाढेल. त्यातून कोळशावर चांगला पर्याय उपलब्ध होऊन शेतकऱ्यांना उसाच्या दरात बांबूची विक्री करता येईल. शेतकऱ्यांच्या पारंपरिक शेतीला तंत्रज्ञानाची जोड दिल्यास शेत उत्पादन व शेतकऱ्यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढू शकते. बजाज, हिरो, टीव्हीएस या कंपनीने इथेनॉलवर चालणारे वाहन तयार केले आहे. आता ऑटोरिक्षा, दुचाकी, कार इथेनॉलवर चालतील. त्यामुळे भविष्यात या वाहनामुळे आयात केलेल्या इंधनाचे १६ लाख कोटी वाचून त्यातील ५ लाख कोटी शेतकऱ्यांच्या खिशात जाऊ शकत असल्याचेही गडकरी म्हणाले. याप्रसंगी इतरही पाहुण्यांनी त्यांचे मत मांडले.
स्पेनमधून आणलेला संत्र्याला लवकरच फळे
संत्र्याचे चांगले कलम आणि चांगले बियाणे शेतकऱ्यांना मिळायला हवे. त्यासाठी संत्रा संशोधन केंद्र चांगले काम करीत आहे. स्पेनमधून संत्र्याचे एक कलम आणले आहे. हे वृक्ष वाढत असून त्यातून लवकरच संत्री उपलब्ध होईल, असेही गडकरी यांनी सांगितले.