महेश बोकडे, लोकसत्ता
नागपूर : महात्मा फुले जनआरोग्य योजनेत अस्थिमज्जा प्रत्यारोपण नसल्याने सिकलसेल, थॅलेसेमियाग्रस्तांना आर्थिक अडचणीमुळे उपचार घेता येत नाही. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून अस्थिमज्जा प्रत्यारोपणाचा योजनेत समावेश करण्याची विनंती केली आहे. तर एम्स रुग्णालय प्रशासनानेही योजनेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र लिहून या रुग्णांना न्याय देण्यासाठी साकडे घातले आहे.
हेही वाचा >>> वाशीम : ठराविक महिलेबाबत बोलल्यामुळेच महाविकास आघाडीकडून आगपाखड; चित्रा वाघ यांची टीका
गडकरी यांनी मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले की, राज्यातील सिकलसेल, थॅलेसिमियाग्रस्त रुग्णांचा महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समावेश नाही. या रुग्णांवर अस्थिमज्जा प्रत्यारोपण आवश्यक आहे. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यांमध्ये हे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत. राज्यातील एकमात्र नागपुरातील एम्स रुग्णालयात नुकतेच अस्थिमज्जा प्रत्यारोपणाची सोय सुरू झाली. परंतु, महात्मा फुले जनआरोग्य योजनेत नसल्याने या रुग्णांना या प्रत्यारोपणासाठी आर्थिक अडचणी येतात.
दरम्यान, अस्थिमज्जा प्रत्यारोपणाचा महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समावेश केल्यास या गरीब व गरजू रुग्णांना लाभ होईल. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सहकार्य करण्याची विनंती गडकरी यांनी पत्रातून केली. तर गडकरी यांच्याच पत्राचा आधार घेत एम्सच्या संचालिका डॉ. विभा दत्ता यांनीही महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या राज्यातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला पत्र लिहिले. त्यात एम्सच्या वतीने डॉ. दत्ता म्हणाल्या की, विदर्भात सिकलसेल व थॅलेसेमियाचे रुग्ण खूप जास्त आहे. एम्सला अस्थिमज्जा प्रत्यारोपण सुरू झाले परंतु महात्मा फुले जनआरोग्य योजनेत नसल्याने या गरीब रुग्णांना योजनेचा लाभ देता येत नाही. अस्थिमज्जा प्रत्यारोपणाला प्रति रुग्ण ३ ते ८ लाख रुपयांचा खर्च येतो.
रक्ताच्या कर्करुग्णांनाही फटका
अस्थिमज्जा प्रत्यारोपणाचा महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समावेश नसल्याने सिकलसेल, थॅलेसेमियाच्या रुग्णांसाठी रक्ताच्या कर्करुग्णांनाही फटका बसत आहे. नागपूरसह राज्याच्या अनेक भागात रक्ताच्या कर्करोगाचे बरेच रुग्ण आहेत. या रुग्णांनाही उपचार म्हणून अस्थिमज्जा प्रत्यारोपणच करावे लागते. त्यामुळे योजनेत समावेश होऊन या रुग्णांना न्याय कधी मिळणार? हा प्रश्न अनुत्तरित आहे.