Nitin Gadkari not Present in 98th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan 2025 तब्बल सात दशकांनी देशाची राजधानी दिल्ली येथे आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. या संमेलनासाठी मराठी सारस्वतांची मांदियाळी दिल्लीत जमली असून देश व विदेशातील साहित्य रसिकही मोठ्या संख्येने पोहोचत आहेत.
दुपारी ३.३० वाजता विज्ञान भवनात संमेलनाचे पहिले उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणारे मोदी हे नेहरूंनंतरचे दुसरे पंतप्रधान असतील. अध्यक्षस्थानी संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर राहतील. यावेळी मंचावर संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार व प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असतील. परंतु. इतक्या राजकीय गर्दीतही एक चेहरा मात्र हरवला आहे. तो चेहरा आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरीं यांचा. दिल्लीतला प्रमुख मराठी नेता अशी गडकरींची ओळख. मराठी भाषेच्या विकासासाठी अनेक शासकीय शासकीय चौकट ओलांडून सहकार्य केल्याच्या अनेक उदाहरणांची नोंद गडकरींच्या नावावर आहे.
पण, मग असे काय घडले की, दिल्लीत संमेलन होत असतानाही गडकरी कुठेच का नाहीत? उद्घाटनीय सत्रात गडकरींचे नाव नाही. दिसन दिवसातील विविध सत्रांमध्येही गडकरी कुठेच नाहीत. किमान समोराच्या कार्यक्रमाला तरी ते असतील असे वाटत होते.पण, त्या यादीतही गडकरींचे नाव नाही. ज्या सरकारी जाहिरातील दिल्लीत झळकत आहेत त्यातही गडकरी कुठेच नाहीत. जाहिरात राज्य सरकारची असली तरी दिल्लीतला प्रमुख मराठी चेहरा म्हणून गडकरींना या जाहिरातीत स्थान देता आले असते. पण, तसे काही घडलेले नाही. आयोजकांनी गडकरींना निमंत्रण दिल्याचे कळते. पण, गडकरींनी ते का स्वीकारले नाही, हा कोडयात टाकणारा प्रश्न आहे.
महाराष्ट्रातून मोठया संख्येने आलेल्या मराठी माणसांना ही गोष्ट दिल्लीत खूपच खटकत आहेत. गडकरी का नाहीत, असा त्यांचा साधा प्रश्न आहे. पण. या प्रश्नाचे उत्तर देणार कोण? कारण. त्यांच्या स्वभानुसार काही बोलणार नाहीत. पण, ते बोलले नाही म्हणून काहीच कळणार नाही, असेही नाही. यातले कारण काहीही असो. मराठीच्या सर्वात मोठया सोहळयात गडकरी कुठेच नाहीत. हे वास्तव आहे. दरम्यान, ‘सरहद’ संस्थेकडून आयोजित या संमेलनात सुमारे १०० पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे.
तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात राज्यभरातील ख्यातनाम साहित्यिकांसोबतच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे, महाराष्ट्राचे मंत्री उदय सामंत आणि आशीष शेलार, काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय कॅबिनेट मंत्री सुरेश प्रभू, महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत.