नागपूर: केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे बेधडक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. नागपुरातील वनामती येथे शुक्रवारी झालेल्या संत्री उत्पादकांच्या कार्यशाळेत त्यांनी योग गुरू रामदेवबाबांबाबत असेच वक्तव्य केले. नितीन गडकरी प्रत्यक्षात काय बोलले? याबाबत आपण जाणून घेऊ या.
नागपुरात रामदेवबाबा यांच्या पतांजली उद्योग समुहाने संत्री प्रक्रिया प्रकल्प नुकताच सुरू केला आहे. या प्रकल्पावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, रामदेवबाबा यांनी आमच्या म्हणण्यावरून नागपुरात मोठा संत्रा प्रक्रिया प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पाला रोज ८०० टन संत्राची गरज आहे. एवढी संत्रा मिळाला नाही तर रामदेवबाबांवर येथे योगासन करण्याची पाळी येईल. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होईल.
दरम्यान नागपूरसह विदर्भातील शेतकऱ्यांकडून सध्या एकरी ४ ते ६ टन संत्राचे उत्पादन घेतले जाते. हे उत्पादन आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने २० ते २५ टन एकरी पर्यंत वाढवण्याची गरज आहे. त्यासाठी एकीकडे येथील शेतकऱ्यांनी त्यांच्या शेत जमिनीची तपासणी करून विविध उपाय करण्याची गरज आहे. त्यानुसार चांगल्या संत्र्याच्या बीज, रोप वा कलमांचा वापर, शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, रोगरहित रोपाचा वापर करून जास्तित जास्त संत्राचे उत्पादन मिळवण्याची गरज असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.
मध्यप्रदेशातील धार येथे गेलो असता तेथे एक संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ मला भेटले. त्यांनी तेथील लहान संत्र्याला केवळ २ रुपये दर असल्याचे सांगितले. रामदेवबाबा यांच्या नागपुरातील प्रकल्पात या संत्राला जास्त दर मिळवून देण्याची विनंती मला केली. त्यावर मी त्यांना तुम्ही संत्री एकत्र करून नागपुरात घेऊन या. मी रामदेवबाबा यांच्या प्रकल्पात त्याला चांगला दर मिळवून देण्याबाबत सांगितले. येथे या संत्र्याला २० ते २२ रुपये दर मिळणार असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.
नागपूर विमानतळावरही ब्रांडेड संत्रा मिळणार… नागपूर विमानतळावर बाराही महिने संत्राचा एक ब्रांड तयार करून विक्रीसाठी उपलब्ध करण्याची सोय केली आहे. त्यातून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दर मिळेल. दुसरीकडे मदर डेअरीकडूनही एक हजार टन संत्र्याची ऑर्डर मिळवून दिली आहे. ही संत्री दिल्लीसह देशातील इतरही भागात जातील. त्यातून नागपूरसह विदर्भातील संत्र्याचे ब्रांडीग होऊन त्याला चांगला बाजारही मिळणार असल्याचेही नितीन गडकरी यांनी सांगितले. नितीन गडकरींच्या म्हणण्यानुसार नागपूरसह विदर्भातील संत्रयांचे ब्रांड तयार होऊन ते देशभरात चांगल्या दलात विकले जाणार काय? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.