नागपूर : आम्ही राजकारणात असल्यामुळे सध्या वाटते की आम्ही जसे बोलतो तसे करत नाही आणि जसे बोलतो तसे वागत नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षात राजकीय नेत्यांबद्दलची विश्वसनीयता कमी होत चालली आहे. लोकांना मूर्ख बनविणे सोपे आहे पण विश्वसनीयता कमविणे आज कठीण झाले आहे. काही नेते तर समाजाला अनेक प्रकारे तोडण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकीय नेत्यांना टोला लगावला.

अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या उद्घाटनाच्यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते. सुरेश भट सभागृहात या कायर्क्रमाचे आयोजन करण्यात आल होते. यावेळी नितीन गडकरी म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्यावेळी प्रचार करत असताना कधीही जातपात पाळली नाही आणि पाळत नाही. मला वोट द्या किंवा नको देऊ पण सर्व जाती धर्माचे मी काम करणार असे त्यावेळी सांगत होतो.

हे ही वाचा… ‘ग्रीन गणेशा!’ यावर्षी सावंगीचा गणेश देणार निसर्गप्रेमाचा संदेश

समाजामध्ये जातीय विषमता आणि आर्थिक विषमता निर्माण झाली आहे. कोणीही व्यक्ती जातीने मोठा नाही, त्याच्या गुणांनी मोठी असते. समाजातील ही जातीयता संपली पाहिजे. स्त्री पुरुष भेदही संपला पाहिजे. माणूस हा जात पंथ धर्म भाषा याने मोठा नसतो तर गुणांनी मोठा असतो, असेही गडकरी म्हणाले. राजकारणात काम करताना आपल्या कथनी आणि करणीमध्ये अंतर नको. समाजात समानता प्रस्थापित झाली पाहिजे आणि हाच संदेश चक्रधर स्वामींनी दिला आहे.

पैसा कमविणे गुन्हा नाही तर ते जीवनाचे साधन आहे मात्र साध्य नाही. लोकसभा निवडणुकीच्यावेळी कोणीतरी प्रचाराची कॅसेट तयार केली.त्यातील गाणे यु ट्यूबवर टाकण्यात आले आणि खूप लोकप्रिय झाले. ८० लाख लोकांनी ते ऐकले. त्याची रॉयल्टी म्हणून म्हणून मला ८५ हजार रुपये मिळाले आहे. चांगले काम केले तर आशीर्वाद तुमच्या पाठिशी असतो. देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने घेत राहावे आणि एक दिवस देणाऱ्यांनी घेणाऱ्याचे हात घ्यावे. एखादे काम केल्यानंतर त्या कामाचा गाजावाजा नको. आज दहा रुपये दान देतात आणि चौकात आपले फोटो लावतात अशी टीका त्यांनी केली.

हे ही वाचा… अकोला : गणेशोत्सवावर महागाईचे ‘विघ्न’,मूर्तीच्या किंमतीत २० % वाढ

चक्रधर स्वामींनी जे विचारधन दिले आहे ते समाजाला दिशा दाखविणारे आहे. समाजाला कल्याणाशी आणि प्रबोधनाशी जोडले पाहिजे. समाज प्रबोधनाचा संबंध लोक संस्काराशी आहे. स्वामिंनी हाच विचार दिला आणि तो प्रत्येकासाठी महत्त्वाचा संदेश असल्याचे गडकरी म्हणाले.