लोकसत्ता टीम
नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील वाघांनी भारतीय पर्यटकांनाच नव्हे तर परदेशी पर्यटकांनादेखील भुरळ घातली आहे. जगभरातून पर्यटक येथे व्याघ्रदर्शनासाठी येतात. यात अतिविशिष्ट व्यक्तींचाही समावेश आहे. अलीकडेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कुटुंबियांसह ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाला भेट दिली. यावेळी त्यांना बछड्यांसह आठ वाघांचे दर्शन झाले.
महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूकांचे पाचही टप्पे पार पडले आहेत. तर संपूर्ण देशभरात या निवडणूकाचा एक शेवटचा टप्पा बाकी आहे. त्यामुळे यात सहभागी असणाऱ्या मंत्र्यांपासून तर कार्यकर्त्यांना आता बराच निवांत वेळ आहे. एवढेच नाही तर लोकसभा निवडणूकांमुळे आलेला थकवा घालवण्यासाठी प्रत्येकजण कुठे ना कुठे जात आहेत. यादरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही त्यांचा वेळ कुटुंबियांसोबत घालवला. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला त्यांनी कुटुंबियांसोबत त्यांचा वेळ घालवण्यासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाकडे प्रयाण केले. शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस त्यांनी ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात कुटुंबियांसोबत सफारी केली. यावेळी त्यांनी वन्यजीवप्रेमी धनंजय बापट यांच्या मालकीच्या रॉयल टायगर रिसॉर्ट येथे मुक्काम केला.
आणखी वाचा-उष्माघाताच्या वाढत्या धोक्यामुळे अकोल्यात जमावबंदी
शुक्रवारी त्यांनी ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात सफारी केली. मोहर्ली प्रवेशद्वारावरुन ते आत गेले. यावेळी त्यांना वाटेतच व्याघ्रदर्शन झाले. तर शनिवारी देखील सकाळी त्यांनी ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रात सफारी केली. यासाठी त्यांनी आगरझरी प्रवेशद्वाराची निवड केली. येथेही त्यांना व्याघ्रदर्शन झाले. दोनदा त्यांना वाघीण आणि दोन बछडे दिसून आले. नितीन गडकरींचा साधेपणा येथेही दिसून आला. नियमानुसार त्यांनी सफारीसाठी नोंदणी केली आणि सकाळच्या सफारीच्या वेळी देखील ते पावणेसहा वाजताच सफारी प्रवेशद्वारावर हजर राहीले.
यादरम्यान केंद्रीय मंत्रीपदाचा कोणताही बडेजाव त्यांच्या वागण्यात दिसून आला नाही. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी या ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात व्याघ्रदर्शनासाठी आल्या होत्या. २७ मे रोजी गडकरी यांचा वाढदिवस आहे आणि त्याच्या दोन दिवसांपूर्वीच त्यांना ताडोबात एक-दोन नाही तर बछड्यांसह आठ वाघांनी दर्शन दिले. उन्हाळ्यात साधारणपणे पाणवठ्यात वाघ दिसून येतात. गडकरी यांनाही नैसर्गिक पाणवठ्यात बसलेला वाघ दिसला. एवढेच नाही तर वाघिणीच्या अंगावर बसून मस्ती करणारे बछडे देखील त्यांना दिसले. शनिवारी देखील ते ताडोबात मुक्काम करणार होते. मात्र, काम आल्यामुळे शनिवारी सकाळच्या व्याघ्रदर्शनानंतर ते नागपूरकडे परतले.