बुलढाणा : खडकपूर्णा धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळावे, या मागणीसाठी युवा शेतकरी कैलास नागरे यांनी दिलेले बलीदान व्यर्थ जाऊ देणार नाही, अशी ग्वाही केद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली.
बुलढाणा जिल्ह्याच्या देऊळगाव राजा तालुक्यातील शिवणी अरमाळ या गावातील शेतकरी कैलास नागरे यांनी खडकपूर्णा धरणातील डाव्या कालव्याद्वारे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळावे, या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधत आंदोलने केलीत. मात्र कारवाई न झाल्याने विषारी औषध प्राशन करून आपल्या शेतामध्ये त्यांनी जीवन संपवले. आज त्यांच्या रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम येथे पार त्त्यांचे अर्जुनराव नागरे यांची केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सांत्वनपर भेट घेतली. त्यांना धीर देत संवेदना व्यक्त केल्या. केंद्रीय राज्यमंत्री जाधव पुढे म्हणाले की, कैलासराव हे प्रयोगशिल शेतकरी होते. शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांची तळमळ होती, पण त्यांनी एवढे टोकाचे पाऊल उचलणे ही दुदैवी बाब आहे. त्यांचे बलीदान व्यर्थ जाऊ देणार नाही. विदर्भ आणि बुलढाणा जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष भरून काढणाऱ्या वैनगंगा-नळगंगा नदी जोड प्रकल्पाबाबत वेळोवेळी लोकसभेत प्रश्न उपस्थित करून तो मंजूर करून घेतला. या प्रकल्पासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात ८८ हजार ५५४ कोटी रुपये मंजूर केले. हा प्रकल्प झाल्यावर बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शासकीय व्यवस्थेचा बळी : आमदार खरात
मेहकर मतदारसंघांचे आमदार सिद्धार्थ खरात यांनीदेखील आज नागरे परिवाराची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना ते म्हणाले की, शासनाचा शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरीच शेती आहुती मागतेय, असे पत्र लिहून जीवन संपवतो तर राज्यात सामान्य शेतकऱ्यांची काय अवस्था असेल. कैलास नागरे यांची ही आत्महत्या नसून सरकारी व्यवस्थेने त्यांचा बळी घेतला आहे. अजून किती कैलासांना सरकार कैलासवासी करणार आहे? असा संतप्त सवाल आमदार सिद्धार्थ खरात यांनी केला.
कैलास नागरे यांच्या कुटुंबीयांना तत्काळ मदत मिळावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. उच्चशिक्षित कैलास नागरे यांना शेतीची अत्यंत ओढ होती. शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून शेती नफ्यात कशी येईल, यासाठी ते कायम प्रयत्नशील असायचे. त्यांचे अख्ख कुटुंब शेतामध्ये राबराब राबायचं. ही आत्महत्या नसून व्यवस्थेने केलेली हत्याच आहे, असे आमदार खरात म्हणाले.