बुलढाणा : केंद्रीय आरोग्य, आयुष आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी प्रसिद्धी माध्यमांसोबत बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांना लक्ष्य केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपवण्याची खासदार संजय राऊत यांनी ‘मनोमन प्रतिज्ञा’ केली होती. त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे त्यांनी ही कामगिरी बव्हंशी पार पाडली आहे. मनोमन केलेली ही प्रतिज्ञा पूर्ण करण्यात त्यांना मोठ्या प्रमाणात यश आले, अशी बोचरी टीका प्रतापराव जाधव यांनी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> भाजप आमदाराच्या जिवाला बच्चू कडूंच्या कार्यकर्त्यांकडून धोका, सुरक्षा पुरवण्‍याची मागणी

आज बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आले असता केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यलय परिसरातील आपल्या जनसंपर्क कार्यालयात जनता दरबार घेतला. यानंतर त्यांनी उपस्थित निवडक प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधींशी अनौपाचारिक संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध राजकीय विषयावर मनमोकळी चर्चा करीत भाष्य केले. दरम्यान, खासदार संजय राऊत यांच्याबद्दल विचारणा केली असता  त्यांच्यावर काय बोलावे? असा प्रतिप्रश्न त्यांनी स्मितमुद्रेने केला. त्यांनी मनोमन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला संपविण्याचा संकल्प नव्हे प्रतिज्ञा केली होती. ठाकरे सेनेची आजवरची कमगिरी, सध्याची स्थिती, बिकट दशा लक्षात घेतली तर ठाकरे सेना संपविण्याची त्यांची प्रतिज्ञा जवळपास पूर्ण झाली आहे, असे ते म्हणाले.

हेही वाचा >>> धावत्या दक्षिण एक्स्प्रेसमधील थरार , प्रवाशाचा खून

शरद पवार, अजित पवार त्यावर विचार करतील

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांच्या पवार कुटुंब एकत्र येण्याच्या बहुचर्चित विधानाबद्दल जाधव यांना विचारणा करण्यात आली. यावर ते म्हणाले, पवार कुटुंबीयांची (शरद पवार आणि अजित पवार यांची) राजकारणामध्ये दिशा आणि विचार वेगळे आहेत. असे असले तरी ते आजपर्यंत कौटुंबिक संबंध जोपासत आले आहेत. अनेक कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये ते एकत्र येत असतात. त्यामुळे घरातील ज्येष्ठ आणि दोन कुटुंबप्रमुख म्हणून पवार कुटुंब एकत्र यावे, यासाठी आशाताई पवार यांनी विठ्ठलाला साकडे घातले असावे. त्यावर शरद पवार आणि अजित पवार नक्कीच विचार करतील.

पालकमंत्री नियुक्तीबद्दल काय म्हणाले?

राज्याचे मंत्रिमंडळ, अनेक मंत्र्यांनी न स्वीकारलेला प्रभार, पालकमंत्र्यांच्या रखडलेल्या नियुक्त्या, यांबद्दल विचारले असता जाधव म्हणाले की, गेल्या मंत्रिमंडळात मंत्र्यांची संख्या कमी होती, तुलनेने यावेळी ती वाढली आहे. येत्या दोन दिवसांत सर्व मंत्री आपापला पदभार स्वीकारतील आणि पालकमंत्री जाहीर होतील.

तक्रारींचा ‘ऑन द स्पॉट’ निपटारा

यावेळी त्यांनी लोकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करून नागरिकांचे प्रश्न मार्गी लावले. बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील मतदारांना येणाऱ्या अडचणींसंदर्भात त्यांनी थेट संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधून तक्रारींचा ‘ऑन द स्पॉट’ निपटारा केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Union minister prataprao jadhav target ubt leader mp sanjay raut while talking to media scm 61 zws