नागपूर: राज्यात भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भारतीय रिपब्लिकन पक्षासह इतर पक्ष अशा महायुतीची सरकार सत्तेवर आहे. नंतर अजित पवारही सरकारमध्ये आले. त्यामुळे येथे गर्दी वाढल्याने आता महायुतीत नवीन पक्षांना प्रवेश नको, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व भारतीय रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) प्रमुख रामदास आठवले यांनी वर्तवले.
नागपुरातील रवीभवन येथे सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आठवले पुढे म्हणाले, सरकारमध्ये अजित पवार सहभागी झाल्याने महायुती आणखी मजबूत झाली. परंतु आता लोकसभा व विधानसभेच्या जागा कुणाला किती मिळेल, हा प्रश्न निर्माण झाला आहे. महायुतीतील कोणत्या पक्षाला किती जागा? याबाबत आम्ही सगळे पक्ष एकत्र बसून निर्णय घेऊ. जागेचा तिढा वाढू नये म्हणून आता नवीन पक्षांना महायुतीत प्रवेश देऊ नये. आमच्या पक्षाकडून महाराष्ट्रात लोकसभेच्या २, विधानसभेच्या १० ते १२ जागांची मागणी आहे. तर देशाच्या उत्तर प्रदेशसह इतरही राज्यात आमच्या पक्षाची ताकद असल्याने तेथेही विधानसभा आणि लोकसभेच्या जागांची मागणी भाजपकडे केली जाईल, असेही आठवले म्हणाले.
हेही वाचा >>>शेगावात पन्नास हजारांवर भाविक! साप्ताहिक सुट्या व एकादशीचा योग; भाविकांमुळे विदर्भ पंढरी फुलली
हेही वाचा >>>बुलढाणा : अतिवृष्टीचे तांडव; दीड लाख हेक्टरवरील खरीप पिकांची नासाडी; सव्वाचार हजार हेक्टर जमीन निकामी, १६१ कोटींची गरज
विरोधकांच्या ‘इंडिया’ नावावर माझा आक्षेप
विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया नावाने नवीन आघाडी तयार केली आहे. विरोधकांनी सरकारच्या विरोधात लढण्यासाठी एकत्र यायलाच हवे. परंतु इंडिया हे नाव देणे योग्य नाही. विरोधकांना सध्या पंतप्रधान पदाचा उमेदवार सांगता येत नाही. काँग्रेसचे राहूल गांधी यांनी मागे अध्यक्षपद सोडायला नको होते. त्यांच्या पद सोडल्याने नागरिकांत त्यांच्याबाबत पडपूटेपनाची भावना तयार झाली, असेही आठवले म्हणाले.