नागपूर: केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज पत्रकार परिषद घेत काही मुद्यांवर नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे महायुती सरकारच्या नव्या मंत्र्यांच्या शपथविधीचा कार्यक्रम काही दिवसांआधी पार पडला. तर दुसरीकडे रामदास आठवले यांनी पत्रकार परिषद घेत नाराजी व्यक्त केली.

लोकसभा निवडणुकीवेळी आम्हाला जागा मिळाल्या नाही. विधानसभेत तीन ते चार जागा मिळतील याची अपेक्षा होती. मात्र एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे, अशी खंत रामदास आठवले यांनी व्यक्त केली. देवेंद्र फडणीस मुख्यमंत्री झाले. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. मात्र त्यांनी अनेकवेळा आम्हाला विधानपरिषद आणि मंत्रीपद देण्याचे आश्वासन दिले. आम्ही विधानसभा निवडणुकीत सांगितले होते की जागा देत नसाल तर आम्हाला मंत्रिमंडळात पहिल्यांदा सन्मान द्या. मागच्या मंत्रिमंडळ विस्तारावेळी सांगितले होते की, तुम्हाला मंत्रिपद देऊ. मात्र अडीच वर्ष मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. यामुळे आमच्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली नाही. आणि आताही मंत्रिमंडळात स्थान दिले नाही, अशा शब्दांत रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा – “त्यामुळेच मी तीन वेळा मुख्यमंत्री होऊ शकलो”, फडणवीसांनी कारणच सांगितले

नाराजीचे हे सांगिले कारण

आम्ही प्रामाणिकपणाने महायुती आणि भाजपसोबत बारा वर्षांपासून आहोत. आमचा पक्ष मोठा आहे. मात्र आमच्या पक्षात कुठल्या कार्यकर्त्यांना मंत्रीपद मिळत नाही ही बाब मनाला दुःख देणारी आहे. मंत्रिमंडळ विस्तारात रिपब्लिकन पक्षाचा विचार न केल्याने आमच्या पक्षात नाराजी आहे. आमचा पक्ष तुमच्यासोबत असताना असे करत असाल तर ही बाब गंभीर आहे. आम्ही काँग्रेससोबत असताना त्यांनी सहा ते सात विधानपरिषदेच्या जागा दिल्या होत्या. भाजप बारा वर्षांपासून फक्त मला मंत्रिपद देते. परंतु, माझ्या पक्षाला एकही विधानपरिषदेची जागा आणि मंत्रिपद दिले नाही अशी नाराजी रामदास आठवले यांनी व्यक्त केली.

भाजप आमचा विचार करत नाही

मंत्रिपदासाठी आमची भाजपच्या केंद्रीय नेतृत्वामधील जे. पी. नड्डा आणि अमित शाह यांच्यासोबत बोलणे झाले होते. तेव्हा शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बोलण्यास सागितले. फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला नाही. आमच्या कार्यकर्त्यांनी महायुतीचे काम केले. त्यामुळे आमची नाराजी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम पाहून आम्ही त्याच्यांसोबत आहोत. मात्र भाजप आमचा विचार करत नाही, अशीदेखील खंत आठवले यांनी व्यक्त केली.

हेही वाचा – बुलढाणा : बिबट माता आणि हरवलेल्या पिल्लाची पुनर्भेट

उमेदवारही त्यांचाच आणि चिन्हही त्यांचेच

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भाजपने आम्हाला काही जागा देणे आवश्यक आहे. नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्येही आम्ही काही जागांची मागणी केली आहे. परंतु, यावेळी जर आम्हाला निवडणुकीत वाटा मिळाला नाही तर आम्ही स्वबळावर काही जागा लढू आणि अन्य जागांवर भाजपला पाठिंबा देऊ. भाजपने विधानसभेत काही जागा दिल्या. परंतु उमेदवारही त्यांचाच आणि चिन्हसुद्धा त्यांचेच होते. त्यामुळे असे चालणार नाही असे आठवले म्हणाले.

Story img Loader