अकोला : शरद पवार कृषिमंत्री असतांना कधी शेतकऱ्यांच्या शेतावर दिसले नाहीत, तर खेळाच्या मैदानावर दिसत होते, अशी टीका केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज केली. काँग्रेस व शरद पवार यांनी हमीभावावर ५० टक्के नफा देण्याची डॉ. स्वामिनाथन यांची शिफारस लागू करण्यास नकार दिला होतो, असा आरोप देखील त्यांनी केला. पोहरादेवी येथील नंगारा संग्रहालयाच्या लोकार्पण कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.
पुढे ते म्हणाले, खटाखटवाल्यांची सरकार असतांना त्यांचे मुख्य म्हणत होते की एक रुपया पाठवला तर त्याचे १५ पैसे मिळतात. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये आता एक क्लिक केल्यावर २० हजार ४०० करोड रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचतील. एक रुपया इकडे-तिकडे जाणार नाही. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणारे नरेंद्र मोदींचे नेतृत्व आहे.
सोयाबीनचे भाव कमी झाले, तर बाहेरुन येणाऱ्या तेलावर २० टक्के आयात शुल्क लावले. त्यामुळेच सोयाबीनचे भाव सातत्याने वाढत आहेत. कांद्याचे निर्यात शुल्क ४० टक्क्यावरून २० टक्के केले. काँग्रेस सरकारने कधी हमीभावावर कृषिमालाची खरेदी केली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टी निर्णयामुळे आता हमीभावावर कृषिमालाची खरेदी केली जात आहे. खर्चावर ५० टक्के नफा देऊन शेतकऱ्यांना हमीभाव देण्याचा निर्णय पंतप्रधान मोदींनी घेतला असून त्याची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे शिवराजसिंह चौहान म्हणाले.
दूध उत्पादनात ५७.६२ वृद्धी
मोदी सरकार आल्यापासून देशातील दूध उत्पादनात ५७.६२ टक्के वृद्धी झाली असून हा जागतिक विक्रम आहे. जागतिक स्तरावर वर्षाला दोन टक्के दूध उत्पादन वाढते, मात्र भारतात आता वार्षिक सहा टक्के दूध उत्पादन वाढ होत आहे. मोदी सरकारच्या गोकूळ मिशनचा हा परिणाम आहे, असे केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री राजीव रंजन सिंह म्हणाले.
हे ही वाचा…सुधीर मुनगंटीवार यांना डी.लिट. म्हणजे चंद्रपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा
शेतकऱ्यांना पशुधनात वाढ करण्यासाठी ‘युनिफाईड जिनोमिक चिप’ आणि स्वदेशी बनावटीच्या लिंग-वर्गीकृत वीर्य तंत्रज्ञान उपक्रम सुरू करण्यात येत आहे. जनुकीय निवडीच्या अंमलबजावणीमुळे तरुण उच्च दर्जाच्या बैलाची कमी वयातच निवड करणे शक्य होईल. या दोन्ही योजनांचा शेतकऱ्यांसह पशुपालकांना लाभ होईल, असे ते म्हणाले.