नागपूर : प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि पर्यटनस्थळ रामटेकच्या गडमंदिरात ‘रोप-वे’साठी केंद्रीय रस्ते वाहतूक खात्याने १५१ कोटी रुपये मंजूर केले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली. ६५० मीटर लांबीचा हा ‘रोप-वे’ असणार आहे. त्याची उभारणी, संचालन आणि देखभाल दुरुस्तीसाठी ही रक्कम खर्च केली जाणार आहे.

रामटेक हे महाराष्ट्रातील एक प्रमुख धार्मिक स्थळ आहे. वनवासात असताना श्रीरामाने येथे वास्तव्य केले होते, अशी आख्यायिका आहे. हा परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. गडमंदिरात दरवर्षी यात्राही भरते. दरवर्षी आठ लाख यात्रेकरू गडमंदिराला भेट देतात. दोन मार्गाने मंदिरात जाण्याची सोय आहे.

कार पार्किंगपासून मंदिरात जाण्यासाठी १२० पायऱ्या आहेत तर टेकडीच्या पायथ्यापासून ७०० पायऱ्या आहेत. हा ‘रोप-वे’ प्रकल्प मोनो केबल फिक्स्ड ग्रीपजिंग बँक तंत्रज्ञानाचा वापर करून उभारला जाणार आहे. ज्यात दररोज सात हजार दोनशे प्रवाशांना सेवा देण्याची क्षमता असेल. या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ वाचणार असून पर्यटनाला चालना मिळेल, असे गडकरी यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे.