लोकसत्‍ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमरावती : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील वारकरी दिंड्या पंढरपूरच्‍या दिशेने निघण्‍याची तयारी करीत आहेत. दिवसा मशिदीत अल्लाहचे स्मरण आणि रात्री मंदिरात वास्तव्य करून भगवंतासमोर तपश्चर्या करणाऱ्या गणोरी येथील महंमदखान महाराजांची दिंडी १२ जून रोजी अमरावती जिल्‍ह्यातील गणोरी येथून पंढरपूरकडे रवाना होणार आहे.

वारकरी संप्रदायाने अनेक जातीधर्माच्या लोकांना सामावून घेतले. वारकरी समतेच्या विचारांचा प्रभाव पडलेल्या अनेक सत्पुरुषांची मंदिरे गावोगावी दिसतात. त्‍यातील एक मंदीर भातकुली तालुक्‍यातील गणोरी येथे आहे. या मंदिरात मुस्‍लीम संत महंमदखान महाराजांचे मंदीर आहे. सुमारे ४०० वर्षांपुर्वी महंमदखान महाराज गणोरी येथे आले होते. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात ते आराधना करायचे.

आणखी वाचा-बुलढाणा : एकाच जिल्ह्यातील दोन खासदार मंत्री, नागरिकांच्या विकासाच्या अपेक्षा उंचावल्या

‘सृष्टीचा निर्माता एकच आहे’ या ठाम विश्वासातून महंमदखान महाराजांनी हिंदू-मुस्लिम धार्मिक ऐक्य निर्माण करण्याचा प्रयत्न त्या काळी केला. महंमद खान यांना विठ्ठलभक्तीची ओढ असल्याने ते दरवर्षी पंढरपूरच्या वारीला जात असत. महंमद खान महाराजांच्या समाधीनंतर त्यांच्या वारीची प्रथा बंद पडली होती. एस.टी. महामंडळातील सेवानिवृत्‍त चालक अनिल देशमुख आणि त्‍यांच्‍या सहकाऱ्यांच्‍या पुढाकारातून २००६ पासून वारी पुन्‍हा सुरू करण्‍यात आली. श्री संत महंमद खान महाराज असे या पालखीचे नाव असल्याने अनेकांना प्रश्न पडतात. पण, विठ्ठल भक्‍तीची ओढ त्‍यातून दिसून येते. गणोरी येथील संत महम्मद खान सेवा संस्था ट्रस्‍टची पायदळ पालखी व दिंडी दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरला जात असते. वाटेत ठिकठिकाणी दिंडीमध्ये सहभागी होणाऱ्या भाविकांच्या भोजन आणि निवासाची व्यवस्था भक्तच करतात.

आणखी वाचा-गोंदिया : खासगी ट्रॅव्हल्सला भीषण अपघात, एकाचा मृत्यू; १७ जखमी

गेल्‍या १८ वर्षांपासून पायी दिंडी पंढरपूरला जाते. आजही वारीत अनेक मुस्लीम भक्त पूजा करतात, काही वारीतही येतात. यंदा १२ जून रोजी महंमदखान महाराजांची दिंडी पंढरपूरकडे रवाना होणार असून पालखीचा मुक्‍काम २९ ठिकाणी राहणार आहे. १३ जुलै रोजी पंढरपूर येथील संत गाडगेबाबा धर्मशाळेत विसावा आणि नंतर दैनंदिन कार्यक्रम आयोजित करण्‍यात आले आहेत.

संत महंमदखान महाराज श्रीक्षेत्र गणोरी येथे फकीर वेशात प्रकट झाले होते. ते दिवसभर मशिदीत राहून रात्री विठ्ठल मंदिरात राहायचे. विठ्ठल मंदिरासमोरच्या झाडाखाली ते बसत. त्याच ठिकाणी त्यांचे छोटेखानी मंदिर उभारले गेले आहे. गावकऱ्यांमध्ये महंमदखान महाराजांबाबत प्रचंड श्रद्धा आहे. महंमदखान महाराज यांनी त्‍यांच्‍या काळात धार्मिक सामंजस्य आणि सामाजिक सलोखा कायम राखण्याचे कार्य केले. विविध धर्माचे लोक त्‍यांच्‍या मंदिरात जातात.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unique vision of hindu muslim brotherhood muhammad khan maharajas dindi will departure to pandharpur mma 73 mrj
Show comments