चंद्रपूर: महाऔष्णिक वीज केंद्राला नादुरूस्तीचे ग्रहण लागले आहे. मागील दोन महिन्यांपासून संच क्रमांक ९ बंद अवस्थेत आहे. या संचाच्या जनरेटर मधील रोटर दुरूस्तीसाठी हरिव्दार येथे पाठविण्यात आले आहे. तर बुधवारी सलग दोन वेळा ५०० मेगावॅटचा संच बंद पडला. त्यामुळे २९२० मेगावॅट क्षमतेच्या वीज केंद्रातील उत्पादन सातत्याने १७०० ते १८०० मेगावॅट इतके कमी होत आहे. त्याचा परिणाम उन्हाळ्यात विजेची अधिक गरज असतांना उत्पादन कमी होणार आहे.

येथील महाऔष्णिक वीज केंद्राच्या प्रदूषणामुळे स्थानिक जनता त्रस्त आहे. वीज केंद्रातील बिघाड हा प्रदूषणाला कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र वीज केंद्राला लागलेले नादुरूस्तीचे ग्रहण आता वाढतच चालले आहे. दोन महिन्यांपूर्वी वीज केंद्रातील संच क्रमांक ९ मोठा स्फोट होऊन बंद पडले. हा संच स्थानिक पातळीवर दुरूस्त होत नसल्याचे बघून आता संचाचे जनरेटर मधील रोटर दुरूस्तीसाठी हरिव्दार येथे भेलच्या कारखान्यात पाठविण्यात येणार आहे. तांत्रिक स्थानिक पातळीवर दुरूस्त होणे शक्य नाही ही बाब निदर्शनास आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान रोटर बदलण्याची शक्यता देखील व्यक्त होत आहे. त्यामुळे संच क्रमांक नऊ हा किमान तीन महिने बंद अवस्थेत राहणार आहे. तीन महिन्यातही हा संच सुरू होणार की नाही हे सांगण्यात वीज केंद्राचे अधिकारी तयार नाहीत. दुसरीकडे वीज केंद्राचा पाचशे मेगावॅटचा सहाव्या क्रमांकाचा संच बुधवारी दोन वेळा बंद पडला. तांत्रिक बिघाडामुळेच सलग दोन वेळा हा संच बंद पडला असे सांगण्यात येत आहे. दरम्यान निकृष्ट दर्जाचा कोळसा वीज केंद्राला पुरवठा केला जात आहे. त्याचा परिणाम संचावर होत असून वारंवार संचात तांत्रिक बिघाड निर्माण होवून संच बंद पडण्याच्या घटना घडत असल्याचे सांगण्यात येत आहे.

फ्लाय ॲश मिश्रीत निकृष्ट कोळसा पुरवठा

वीज केंद्राला वेकोली व कोल वॉशरी मधून कोळसा पुरवठा होतो. यातील काही कोळसा हा अतिशय निकृष्ट दर्जाचा असतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वीज केंद्रातून निघणारी फ्लाय ॲश ही स्थानिक सिमेंट कंपन्यांना दिली जाते. तर काही टक्के फ्लाय ॲश शहरातील काही कोळसा व्यापरी खरेदी करतात. हीच फ्लाय ॲश वॉशरीमध्ये नेण्यात येते, तिथे कोळशाची भुकटी व फ्लाय ॲश मिश्रीत केली जाते. त्यानंतर काही प्रमाणात चांगला काेळसा व फ्लाय ॲश मिश्रीत कोळशाची भुकटी मिश्रीत करून हाच कोळसा वीज केंद्राला पाठविला जातो. जिल्ह्यातील काही कोळसा वॉशरीतून हा प्रकार सर्रास सुरू आहे. यामध्ये शहरातील मोठे कोळसा व्यापारी सक्रीय आहेत. या व्यापारातून दररोज लाखोंची कमाई केल्या जात असून त्याचा परिणाम वीज केंद्राचे संच वारंवार बंद पडत आहेत.

Story img Loader