अनिल कांबळे
नागपूर : गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या राज्य पोलीस दलातील सहायक पोलीस आयुक्तांपासून ते पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या सार्वत्रिक बदल्या दोन आठवड्यांपूर्वीच झाल्या. मात्र, पोलीस अधिकाऱ्यांचे घटक प्रमुख कार्यमुक्त करीत नसल्यामुळे पोलीस अधिकारी संभ्रमात पडले आहेत.गृहमंत्रालय आणि पोलीस महासंचालक कार्यालयात योग्य ताळमेळ नसल्यामुळे राज्यभरातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सार्वत्रिक आणि विनंती बदल्या रखडल्या होत्या. त्यासाठी काही प्रमाणात मुख्यमंत्री शिंदे-फडणवीस सरकारमध्ये बदल्यावरून मतभेदही होते, अशी माहिती समोर आली होता. शेवटी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना मुहुर्त सापडला.
दोन आठवड्यापूर्वी सहायक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक तसेच पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्यांची यादी गृहमंत्रालय आणि पोलीस महासंचालक कार्यालयाने जाहिर केली. त्यामुळे राज्य पोलीस दलात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. बदल्यांची यादी जाहिर होताच अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी बदली झालेल्या शहरात बस्तान बसविण्याची तयारी केली. त्या शहरातील मुलांना शाळा शोधणे, घर शोधणे, घरातील सामान बदलीच्या ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली. मात्र, पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच घटक प्रमुखांनी कनिष्ठ अधिकाऱ्यांना बदली झालेल्या ठिकाणी कार्यमुक्त करण्याची तयारीच केली नाही.अनेक अधिकारी घटक प्रमुखांच्या कार्यालयात चकरा मारत आहेत. मात्र, बदली झालेल्या अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करण्यास विलंब करीत आहेत. त्यामुळे राज्य पोलीस दलात अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. पोलीस अधिकाऱ्यांचा आनंदावर विरजन पडले.
हेही वाचा >>>पंधरा दिवसातच सिनेअभिनेत्री रविना टंडन दुसऱ्यांदा ताडोबात; दुपारपर्यंत तब्बल अकरा वाघांचे दर्शन
मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर
सध्या जुलै महिना सुरु झाला आहे. बदली झालेल्या शहरातील शाळा शोधणे आणि मुलांना प्रवेश मिळवून देणे, शाळेचा दाखला किंवा गणवेशासह पुस्तकांची व्यवस्था करणे, इत्यादी व्यवस्था पोलीस अधिकाऱ्यांना करायची आहे. मात्र, घटक प्रमुख कार्यमुक्त करीत नसल्यामुळे बदली झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
हेही वाचा >>>अकोला : रुळावरून चालतांना कानात हेडफोन अन् मागून धडधड मालगाडी आली…पुढे..
तक्रार करावी तर कुणाकडे ?
पोलीस महासंचालकांनी बदलीच्या आदेशातच अधिकाऱ्यांना तातडीने कार्यमुक्त करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तरीही घटक प्रमुख पोलीस महासंचालकांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आहेत. शिस्तप्रीय खाते असल्यामुळे बदली झालेल्या अधिकाऱ्यांना आता तक्रार करावी तर कुणाकडे?, असा प्रश्न पडला आहे.