नागपूर : नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय-रुग्णालयातील फिजिओथेरपी विभागात कार्यरत सहायक प्राध्यापक महिलेचा अज्ञात आरोपीने डोक्यावर हल्ला करुन खून केला. ही घटना शनिवारी रात्री दहा वाजता हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. डॉ. अर्चना अनिल राहुले (वय ५०, लाडीकर लेआउट) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. अर्चना राहुले या लाडीकर लेआऊट, हुडकेश्वर येथे राहत होत्या. डॉ. अर्चना यांचे पती डॉ. अनिल राहुले हे छत्तीसगढ-रायपूर शहरातील वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. ते आठवड्यातून एक दिवस नागपुरात येत असतात. शनिवारी रात्री डॉ. अनिल हे रायपूरवरुन नागपुरात आले. घरी पोहोचल्यानंतर त्यांना घर उघडे दिसले. त्यांना घरातून दुर्गंधी येत असल्याची जाणीव झाली. घरात गेल्यानंतर त्यांना पत्नी अर्चनाचा मृतदेह बेडजवळ पडलेला आढळला. त्यांच्या डोक्यात रॉडने मारण्यात आल्यामुळे मृतदेहाच्या शेजारी सुकलेले रक्त दिसून आले. त्यांनी ही माहिती शेजाऱ्यांना दिल्यानंतर, शेजाऱ्यांनी पोलिसांना सूचना दिली. हुडकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कुणीतरी डोक्यात लोखंडी वस्तू मारुन डॉ. अर्चना यांचा खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली. हुडकेश्वर पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
एकट्याच राहायच्या घरी
डॉ. अर्चना यांचे पती रायपूर शहरात नोकरीवर असल्यामुळे तेदर शनिवारी घरी येत होते. त्यांचा मुलगा मुलगा हासुद्धा पुण्यात एमबीबीएसच्या तृतीय वर्षाला शिक्षण घेत आहे. त्यामुळे अर्चना या एकट्याच घरात राहत होत्या. त्या एकाकी स्वभावाच्या होत्या. त्यामुळे त्या कुणाशी फारशा बोलत नव्हत्या. या घटनेमागे संशय व्यक्त करण्यात येत आहे. अर्चना यांच्या मोबाईलचा सीडीआर काढण्यात येत आहे. त्यांची हत्या होण्यापूर्वी त्यांनी कुणाशी फोनवर बोलणे केले, याबाबत माहिती काढण्यात येत आहे. शेजाऱ्यांकडूनही पोलीस माहिती घेत असून घरी कोण येत होते, याबाबत विचारणा करण्यात येत आहे.
हत्याकांडाचे नेमके कारण गुलदस्त्यात
डॉ. अर्चना या घरात एकट्याच राहत असल्याची माहिती पडल्यानंतर घरात चोरीच्या उद्देशाने चोर घुसले असावेत. चोरी करताना डॉ. अर्चना यांना जाग आली असावी, त्यानंतर चोरट्यांनी त्यांचा खून केला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, हत्याकांडाचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात आहेत. या हत्याकांडाचा तपास ठाणेदार ज्ञानेश्वर भेदोडकर करीत आहेत.