यवतमाळ: अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यासोबत सहा ते सात जणांनी अनैसर्गिक कृत्य केले. आठ महिन्यांपासून सुरू असलेल्या या प्रकाराला कंटाळून अखेर पीडित विद्यार्थ्याने यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
पीडित विद्यार्थी हा यवतमाळ येथील एका इंजिनिअरींग कॉलेजमध्ये मेकॅनिकल अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षाला शिकत आहे. त्याने २०२१ मध्ये येथे प्रवेश घेतला होता. कोविडमुळे कॉलेजचे क्लासेस जानेवारी २०२१ ते एप्रिल २०२२ पर्यंत ऑनलाइन सुरू होते. पाच एप्रिल २०२२ नंतर विद्यार्थी यवतमाळात रहावयास आला. प्रारंभी मायाकांत निवास येथील खोली क्रमांक १० मध्ये तो रहायचा. येथे मुलासोबत जमत नसल्याने त्याने रुमक्रमांक १३ मध्ये रहायला सुरुवात केली.
हेही वाचा… राज्यात पुन्हा एकदा पावसाचे संकेत, १३ ऑगस्टपासून पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार
साधारण आठ महिन्यापूर्वी संशयित चेतन लोंढे याने रात्री फोन करून खोली क्रमांक एक मध्ये बोलावले आणि लगट करणे सुरू केले. त्यावेळी चेतनसह अन्य मित्रांनी किळसवाणा प्रकार केला. ही घटना कुणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार पीडित विद्यार्थ्याने दुसर्या मित्राला सांगितला. त्यानेही सदर विद्यार्थी आपले सिनिअर असून, त्यांच्यापासून दूर रहा अणि खोली बदलण्याचा सल्ला दिला. मात्र, येथे भाडे कमी असल्याने रूम बदलली नाही. अत्याचार करणारे वारंवार फोन करायचे. चेतन हा विद्यार्थ्याला कारमधून न्यायचा आणि किळसवाणा प्रकार करायचा. डिसेंबर महिन्यातही अनैसर्गिक अत्याचार केला होता. जुलै महिन्यात लक्ष्मीनगरातील एका खोलीत कारने उडवून देण्याची धमकी देत अत्याचार केला.
पीडित विद्यार्थ्याने अखेर बुधवारी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून चेतन लोंढे, सूयश आठवले, तेजस यांच्यासह अन्य तिन ते चार जणांविरुद्घ गुन्हा नोंदविण्यात आला. या घटनेचा तपास शहरचेे पोलीस ठाण्याचे निरीक्षक सतीश चवरे करीत आहेत.