अकोला : जिल्ह्यात वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. जिल्ह्यात मध्यरात्रीपासून सर्वत्र पाऊस सुरू आहे. हिवाळ्याच्या दिवसांत अवकाळीमुळे सर्वत्र जलमय परिसर झाला. वादळी वाऱ्यामुळे विविध भागांतील वीजपुरवठा खंडित झाला आहे.
अकोला शहरासह जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाने राज्यात तीन दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती. रविवारी रात्रीच्या सुमारास जिल्ह्याच्या विविध भागांत तसेच शहरात वादळी वारा सुटला. विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. जोरदार पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पाणी साचले. तसेच रस्त्यालगतच्या मोठ्या नाल्यांमधील सांडपाणी सखल भागातील रहिवाशी वस्त्यांमध्ये शिरले.
हेही वाचा – सेवाग्रामचा चरखा थेट वेल्सच्या संसदेत! कसा झाला प्रवास वाचा…
हेही वाचा – नागपूर : लॉजमध्ये प्रेयसीवर बलात्कार, अश्लील छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी
वादळी वाऱ्यामुळे शहरातील जठारपेठ, रामदासपेठ, उमरी, सिव्हिल लाईन, जुने शहर, डाबकी रोड, गोरक्षण, मलकापूर भागात काही ठिकाणी वृक्षांच्या फांद्या जमिनीवर कोसळल्या होत्या. अवकाळी पावसाच्या नैसर्गिक संकटामुळे जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात आले आहेत. खरीप हंगामातील कापूस, तूर पिकासह रब्बी हंगामातील कांदा, हरभरा, गहू व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.