नागपूर : तापमानाने चाळीशी पार केली असतानाच विदर्भाला पुन्हा अवकाळी पावसाने झोडपले. गुरुवारी विदर्भातील अनेक जिल्ह्यात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. वाशीम जिल्ह्यातील रिसोड व अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यात काही ठिकाणी गारपीट झाली. बुलढाणा जिल्ह्यात देखील विजांचे तांडव बघायला मिळाले.
हवामान खात्याने तापमानवाढीसह अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार, विदर्भातील अनेक जिल्ह्यात तापमान ४० ते ४३ अंश सेल्सिअसदरम्यान होते. उकाडा आणि उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त असतानाच अवकाळी पावसाने झोडपले. वाशीम जिल्ह्यातील मालेगाव, मंगरुळपीर, मानोरा तालुक्यात अनेक ठिकाणी विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. मंगरुळपीर तालुक्यातील चिखली शेतशिवारात कडूलिंबाच्या झाडावर वीज कोसळली. अमरावती जिल्ह्यातील धारणी आणि दर्यापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला तर अचलपूर, चांदूरबाजार आणि वरुड येथेही अवकाळी पावसाने हजेरी लावली. धारणीत अनेक घरांचे छप्पर उडाले, झाडे कोसळली व वीजतारा तुटल्या. बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली. संग्रामपुर तालुक्यात झाडे उन्मळून पडली. विजांच्या तांडवामुळे तीन जनावरांचे बळी गेले. नागपूर शहरातही पावसाच्या सरी कोसळल्या. गडचिरोली, वर्धा जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. अकोला, यवतमाळ, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यात मात्र आभाळी वातावरण होते.