लोकसत्ता टीम
वाशीम: हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज ३१ मार्च रोजी जिल्ह्यातील कारंजा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यामुळे सोंगणीला आलेल्या गहू, हरभरा व फळ पिकांचे नुकसान झाले.
हवामान विभागाने वाशीम जिल्ह्यात येलो अलर्ट घोषित करून विजेचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला होता. आज ३१ मार्च रोजी कारंजा तालुक्यात सायंकाळच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला गहू, हरभरा सोबतच भाजीपाला आणि फळबागेचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यापूर्वी १७ मार्च रोजी मालेगाव व इतर ठिकाणी गारपीट झाल्याने फळ बागाचे अतोनात नुकसान झाले होते. त्यानंतर शुक्रवारी कारंजा तालुक्यात अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाल्याने तातडीने पंचानामे करून मदतीची मागणी केली जात आहे.