वाशीम : गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने हाहाकार उडाला आहे. बुधवारी मंगरूळपीर तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपीट झाली. यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या फळबागेसह इतर पिकांचे नुकसान झाले आहे. २७ ते ३० एप्रिलपर्यंत ‘येलो अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे पावसाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडा, असे आवाहन करण्यात येत आहे.
जिल्ह्यात बुधवारी रिसोड, वाशीम व इतर भागात जोरदार पाऊस झाला. मंगरूळपीर तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शहरातील डाक घरासमोरील मुख्य रस्त्यावर झाड कोसळले. तसेच तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, बायपास रोड परिसरातही झाडे कोसळली आहेत. पोलीस वसाहतीमधील अधिकाऱ्यांच्या निवासस्थानावरील टिनपत्रे उडाली व याच वसाहतीत झाड कोसळले, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते महात्मा फुले चौक या दरम्यानच्या रस्त्यावर विजेचा खांब पडल्याने वाहतूक बंद झाली होती.
तालुक्यातील आदर्श ग्राम वनोजा येथील श्रीमती साळुंकाबाई राऊत महाविद्यालयाच्या मुख्य सभागृहाचे छत उडाले. येथील श्री शिवाजी विद्यालयाचे छत उडाल्याने मोठे नुकसान झाले. तसेच गावातील अनेक नागरिकांच्या घरावरील टिनपत्रे उडाल्याने मोठी तारांबळ उडाली. झाडे, विद्युत खांब, विद्युत तारा रस्त्यावर खाली तुटून पडल्या आहेत. मालेगाव मेहकर मुख्य रस्त्यावर वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. अनेक शेतकऱ्यांच्या लिंबू, संत्रा फळबागेतील झाडे उखडून पडले तर अनेक गावांचा विजपुरवठा खंडीत झाला होता.