नागपूर : शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याने हवालदिल झालेल्या विदर्भातील शेतकऱ्यांच्या डोळय़ांत रविवारी अवकाळी पाऊस आणि गारपिटीने पाणी आणले. विदर्भात सर्वत्र अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने मोठय़ा प्रमाणात पिकांची हानी झाली. नागपूर जिल्ह्यात काटोल, कळमेश्वर भागात संत्री उत्पादकांनाही याचा तडाखा बसला.
पश्चिम विदर्भातल्या बुलढाणा जिल्ह्यातील ८० गावांना गारपिटीचा फटका बसला. जिल्ह्यातील रब्बी पिके, फळबागा, भाजीपाला पिकांची हानी झाली. वाशीम जिल्ह्यात तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. गारपिटीमुळे फळबागांची मोठय़ा प्रमाणात हानी झाली. गहू, हरभरा आणि भाजीपाल्याचे मोठे अतोनात नुकसान झाले. पूर्व विदर्भातल्या भंडारा जिल्ह्यात दुपारी १ च्या सुमारास झालेल्या वादळी पावसामुळे पिकांची नासाडी झाली. शहरात दसरा मैदानावर सुरू असलेल्या कृषी महोत्सवालाही पावसाचा फटका बसला. साकोली तालुक्यातील विहीरगावमध्येही गारपीट झाली.
नागपूर जिल्ह्यात काटोल, कळमेश्वर, सावनेर तालुक्यात गारपीट झाली. कळमेश्वर तालुक्यातील कोहळीत शेतात गारांचा थर साचला होता. काटोल तालुक्यात इसापूर, झिल्पा, चिखली, मेडकी, सोनोली, गोंडी दिग्रस, मारखेडी, येनवा आणि वाढोणा भागात गारापीट झाली. त्यामुळे शेतातील गहू, चना, संत्री, मोसंबी पिकांचे नुकसान झाले. राष्ट्रवादीचे नेते आणि जिल्हा परिषद सदस्य ससील देशमुख यांनी काही गावांना भेट देऊन पीक हानीची पाहणी केली.
नागपूर शहरातही पावसाने हजेरी लावली. सोमवारपासून सुरू होणाऱ्या ‘सी-२०’मध्ये संपूर्ण सरकारी यंत्रणा व्यग्र असताना रविवारी झालेल्या पावसामुळे त्यांची तारांबळ उडाली. शहरात अनेक ठिकाणच्या रस्त्यांवर पाणी साचले. महापालिकेने केलेल्या सौंदर्यीकरणालाही पावसाचा फटका बसला. सी-२०चे काही फलक भिजले.
काय घडले?
- बुलढाणा जिल्ह्यातील ८० गावांना फटका, रब्बी पिके, फळबागा, भाजीपाल्याची हानी.
- वाशीम जिल्ह्यात तीन दिवसांपासून पाऊस; गहू, हरभरा मातीमोल.
- भंडारा जिल्ह्यात वादळी पावसामुळे पिकांची नासाडी.
- नागपूर जिल्ह्यात काटोल, कळमेश्वर, सावनेर तालुक्यांत संत्री, मोसंबी बागांचे नुकसान.