बुलढाणा :  हवामान विभागाचा अंदाज खरा ठरवीत जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील ४ हजार १८३ हेक्टर क्षेत्रावरील  रब्बी पिके आणि फळ बागांचे मोठे नुकसान झाले.    

मागील २ आणि ३एप्रिल २०२५  रोजी  जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पावसाने कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली. यामुळे जिल्ह्यातील  रब्बी पिके आणि फळ, भाजीपाला वर्गीय पिके यांचे मोठे नुकसान झाले. नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयाच्या कृषी उप संचालक अनुराधा  गावडे यांनी  जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांना  गुरुवारी, ३ एप्रिल रोजी सादर केला. त्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे ४ हजार १८३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचे नमूद आहे. जिल्ह्यातील तेरा पैकी नऊ तालुक्याना अवकाळीचा फटका बसला आहे.

घाटा वरील तालुक्याच्या तुलनेत घाटा खालील तालुक्यात जास्त नुकसान झाले आहे. सर्वात मोठा फटका नांदुरा तालुक्याला बसला. येथील  ४९ गावांना  तडाखा बसला आहे. १६५५ हेक्टरवरील गहू,  मका, ज्वारी,कांदा, पपई, केळी चे नुकसान झाले आहे.

मोताळा तालुक्यात सातशे दोन हेक्टर वरील मका, ज्वारी, कांदा ची नासाडी झाली आहे. संग्रामपूर तालुक्यातील ५९९ हेक्टरमध्ये  नुकसान झाले. २८ गावांना फटका बसला .  जळगाव जामोद तालुक्यातील १० गावातील  ८७ हेक्टर,  मलकापूर तालुक्यातील १२ गावातील ९० हेक्टर , खामगाव तालुक्यातील ४२ गावातील ९५४ हेक्टर, बुलढाणा तालुक्यातील  १४ गावातील ८४हेक्टर, चिखली मधील २ गावातील १२हेक्ट्रर वारील अंबा पपई कांदा बियाणे ची हानी झाली.