गोंदिया: जिल्ह्यातील देवरी तालुक्यात आज, मंगळवारी (दि. २८ एप्रिल) संध्याकाळी पाच वाजतादरम्यान वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. गोंदिया जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळला. वादळी वारा, विजेच्या कडकडाटात पावसाने झोडपून काढले. काही तालुक्यांत वादळ, पाण्यासह गारपीट झाली.

गेल्या चार दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली होती. रविवारपासून ढगाळ वातावरण होते. संध्याकाळी वादळी वारे, ढगांच्या गडगडाटात पावसाला सुरुवात झाली. जोरदार पावसामुळे सर्वत्र पाणी साचले. माळरानावर कोमेजून जाणाऱ्या पिकांसाठी हा पाऊस उपयुक्त ठरला. तालुक्यातील काही भागांत जोरदार सरी कोसळल्या. देवरी शहरासह परिसरात अर्धा तास पाऊस झाला.

घरांवरील टीनपत्रे उडाली

पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून रब्बी पिकासाठी समाधानकारक पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे. भाताची शेती तयार करण्यासाठी हा पाऊस पूरक असल्याने शेतकरी वर्गात समाधान पसरले आहे. या पावसामुळे देवरी-आमगाव रस्त्यावरील ग्राम भागी जवळील झाड कोसळले. सुदैवाने नुकसान झाले नाही. तसेच तालुक्यात ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली. अनेक गावांतील घरावरील टिनांचे पत्रे उडून गेलीत. यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

देवरी तालुक्याला पावसाने झोडपले

देवरी शहरासह परिसराला सोमवारी सायंकाळी अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटासह अक्षरशः झोडपून काढले. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी साचले. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिक मिळेल त्या ठिकाणी जागा शोधू लागले. पावसाचे थैमान अर्धा तास सुरू होते. मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड झाली. सकल भागात पाण्याचा निचरा न झाल्याने काही परिसर थोड्या काळासाठी जलमय झाला होता. पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.

गोंदिया तालुक्यात गारपिटीसह पाऊस

सोमवारी सकाळपासूनच सूर्यनारायणाने तापायला सुरुवात केली होती, पण दिवस मावळता वातावरणात बदल व्हायला सुरुवात झाली. आकाशात ढग दाटून आले आणि सायंकाळी साडेपाच ते सहा वाजेपर्यंत सुसाट वारा आणि पावसाला सुरुवात झाली. गोंदिया तालुक्यातील काही गावांत पावसासह गारपीटही झाली. तालुक्यातील दवणीवाडा, झालूटोला खातीटोला, पीपरटोला, देवाटोला, डाकराम सुकळी, महालगाव आदी गावांत वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. वादळी वाऱ्यामुळे गावातील गोठ्यांवरील छप्परे उडाली. यात गोठ्यांचे मोठे नुकसान झाले.