लोकसत्ता टीम
नागपूर: उपराजधानीसह संपूर्ण विदर्भात ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाने जोर धरला आहे. काही जिल्ह्यांमध्ये रात्रीपासून तर उपराजधानीत मध्यरात्रीपासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. बुलढाणा जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली असून पावसाचा वेग असाच कायम राहिल्यास इतर जिल्ह्यात देखील पूरस्थिती निर्माण होण्याची धोका आहे.
भारतीय हवामान खात्याने विदर्भासह संपूर्ण राज्यात “ऑरेंज आणि येल्लो अलर्ट” जाहीर केला आहे. शनिवारी चंद्रपूर, अकोला, बुलडाणा, यवतमाळ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. रात्रीपासून विदर्भातील सर्वच जिल्ह्यात अवकाळी पावसाने ठाण मांडले. सर्वच जिल्ह्यातील नदी आणि नाले दुथडी भरून वाहत असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. अमरावती जिल्ह्यात अनेक झाडे उन्मळून पडली.
विजांचे खांब कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला. अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून काहीं गावांचा संपर्क तुटला आहे.