नागपूर : विदर्भात तापमान ऐन मार्च महिन्यात नवे उच्चांक गाठत असतानाच अवकाळी पावसामुळे पारा तब्बल सहा ते आठ अंश सेल्सिअसने खाली आला. आता पुन्हा एकदा हवामान खात्याने उष्णतेचा इशारा दिला आहे.राज्यातील तापमानात सातत्याने चढउतार होत आहे. कधी नाही ते यावर्षी उन्हाळा लवकर सुरू झाला. मार्च महिना संपण्याआतच उष्णतेच्या दोन लाटांचा इशारा हवामान खात्याकडून दिला गेला.

राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद विदर्भात होत गेली आणि तापमानाचे नवनवे उच्चांक मार्च महिन्यातच नोंदवले गेले. अनेक शहरांमध्ये तापमान ४२ अंश सेल्सिअसच्यापलीकडे गेले. तर काही शहरांमध्ये ते ४१ आणि ४० अंशाच्यापलीकडे गेले. तापमानात सातत्याने वाढ होत असतानाच भारतीय हवामान खात्याने वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकटाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला. तब्बल तीन दिवस विदर्भासह राज्यातील इतर भागांना सुद्धा अवकाळीचा तडाखा बसला. काढणीला आलेली पीके अक्षरश: ओली झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. तर बाजारात विक्रीसाठी आलेले धान्य देखील ओले झाल्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. दरम्यान आता पुन्हा एकदा हवामानखात्याने पाच ते आठ एप्रीलदरम्यान वेगवेगळ्या भागात उष्णता वाढू शकते, असा इशारा दिला आहे. यात महाराष्ट्रातील काही शहरांचा समावेश आहे.

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दरम्यानच्या काळात तीन दिवस राज्यातील बहूतांश भागात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाच्या मध्यम ते मुसळधार सरी कोसळल्याने आणि आता तापमानाचा पारा वाढल्याने उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन एप्रिल ते जून या कालावधीत देशातील बहूतांश भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता वर्तवली आहे. महाराष्ट्राच्या बहुतांश भागात तीव्र उन्हाळा असणार आहे. तर, राज्यात उष्णतेच्या तीव्र लाटांचा इशारा देखील हवामान खात्याने दिला आहे.

एप्रिल महिन्यात महाराष्ट्र अधिक तापण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. राज्यासह देशाच्या बहुतांश भागात एप्रिल महिन्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये सलग दोन ते पाच दिवसांच्या कालावधीत उष्णतेच्या लाटांचा अंदाज देखील व्यक्त करण्यात आला आहे. उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तीव्र उष्ण लाटांचा इशारा आहे. तर मराठवाडा आणि विदर्भातही काही प्रमाणात उष्ण लाटांची शक्यता आहे. गुजरात तसेच पूर्व किनारपट्टी आणि पूर्व भारतातही उष्ण लाटांचा इशारा देण्यात आला आहे.